चिमूर :- तालुक्यातील डोमा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर व मंडळ कृषी अधिकारी शंकरपूर यांच्या वतीने जवस लागवड प्रशिक्षण व बियाणे तसेच निविष्ठा वाटप कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील डोमा गावात दिनांक 09.नोव्हेंबर रोजी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर फरकाडे, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, शंकरपूर यांनी केले. डॉ. बिना नायर, जवस पैदासकार, अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय, नागपूर यांनी जवस पिकाचे औषधी गुणधर्म व आरोग्यातील महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. स्वप्नील ठाकरे, जवस कृषी विद्यावेता, अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, नागपूर यांनी जवस पीक लागवड तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. श्री.माटे, मंडळ कृषी अधिकारी, शंकरपूर यांनी तेलबिया पिकाच्या लागवडीसाठी मार्गदर्शन केले. आदिवासी उप प्रकल्प, अनुसूचित जाती प्रकल्प व प्रथम रेषीय प्रकल्प जवस अंतर्गत डोमा, किटाडी मक्ता व डोंगरगाव या गावातील 80 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली व त्यांना बियाणे व निविष्ठा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री. रेंगे, कृषी सहाय्यक, कृषी विभाग, शंकरपूर व सरपंच तसेच उपसरपंच, डोमा तसेच ग्रामस्थांनी मदत केली.