वरोरा – समाजातील अस्वस्थ वास्तवाकडे पाहण्याची इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारची गंभीर मूल्यदृष्टी कवीला प्राप्त झालेली असते. त्याच्याकडे समाजाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्याचे भाष्यज्ञान असते. कवीने या प्रतिभा ज्ञानातून व्यापक अशा समाजजाणिवांसह कवितेतून व्यक्त व्हावे असे उदगार अंमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी काढले. कवितेचे घर, शेगांव ( बुद्रुक ), त. वरोरा, जि चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कवितेसाठी वाहिलेल्या अभिनव अशा कवितेच्या घराचे बापुराव पेटकर काव्य पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, सुप्रसिद्ध कवी व मराठी भाषा विभागप्रमुख स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील डॉ. पी. विठ्ठल, वर्ध्याचे प्रसिद्ध गझलकार विद्यानंद हाडके, कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यात बापुरावजी पेटकर काव्यपुरस्कारप्राप्त मान्यवर कवी डॉ. अशोक इंगळे, अे. के. शेख, एकनाथ आव्हाड, रजनी राठी, शृंखल खेमराज यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बापुरावजी पेटकर काव्य सन्मानाचे मानकरी डॉ. अरविंद पाटील, प्रशांत खैरे, नोमेश नारायण, डॉ. वसुधा वैद्य, मंजुषा दरवरे, सुजित कदम यांना सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रदीप दाते म्हणाले, शेगांव सारख्या ग्रामीण भागात कवितेचे घर उभे राहणे ही अद्वितीय कल्पना आहे. ही अद्वितीय कल्पना भविष्यकाळात अधिक वृद्धिंगत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. पी. विठ्ठल कवींना मार्गदर्शन करताना म्हणाले, कवींनी संकुचित वृत्तीने लेखन करू नये, त्यांनी मोठया जीवनपटाचा भाग व्हावे. त्याच्या कवितेतून वैश्विकतेचे दर्शन व्हावे. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी पुरस्कार सोहळ्याचे कौतुक केले व कवींना पुढील लेखनासाठी सदिच्छा दिल्या. विद्यानंद हाडके यांनी गझल सादर करून जीवनाचे मर्म सांगितले. डॉ. अशोक इंगळे यांनी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व कवींच्या वतीने कवितेच्या घराचे आभार मानले.
कार्यक्रमापूर्वी सकाळी गावातून शाळेतील विद्यार्थ्यांची काव्यदिंडी काढण्यात आली. या काव्यदिंडीत जि. प. प्राथमिक शाळा, शेगांव
नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव, नॅशनल इंग्लिश स्कूल, शेगांव या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले. काव्यदिंडीत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड, प्रसिद्ध अभिनेते सुधीर चित्ते, साहित्यिक रमेश धनावडे, वैभव धनावडे व साहित्यसंपदा समुहाच्या सदस्यांचा समावेश होता. प्रास्ताविकातून कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर यांनी कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. संचालन कार्यवाह प्रमोद नारायणे यांनी केले तर आभार संकल्पनाकार किशोर पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील, विकास जवादे, अमोल दातारकर, डॉ. दीपक लोणकर, प्रा. भालचंद्र लोडे, नितीन वैद्य, भारत रामटेके, रजनी रामटेके, धर्मराज लोडे, आशिष धकाते यांनी मोलाचे सहकार्य केले.