वरोरा :- तालुक्यातील संजय गांधी निराधार लाभार्थी यांचे मागील चार महिन्यापासून चे अनुदान लाभार्थी यांचे खात्यावर जमा झाले नसल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
माहे जून 2023 पासून संजय गांधी निराधार लाभार्थ्याचे अनुदान शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे संजय गांधी लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
संजय गांधी निराधार लाभार्थी ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांची उपजीविकेची समस्या निर्माण झाली आहे. तरी संजय गांधी निराधार लाभार्थी यांचे अनुदान केंद्र व राज्य शासनाकडून वेळेवर प्राप्त झाल्यास गोरगरीब लाभार्थ्यांचा उपजीविकेचा प्रश्न मिटेल. मागील चार महिन्यापासून लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्याने शासनाच्या चुकीचा धोरणामुळे गोरगरीब, अंध, अपंग, विधवा कुटुंबाची व लोकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बाब लक्षात घेऊन वरोरा भद्रावती विधानसभेत क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद भोयर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वरोरा तथा माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती वरोरा व राजेंद्र चिकटे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा यांचे नेतृत्वात वरोरा तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांचे सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे.
तरी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान दिवाळीपूर्वी प्राप्त न झाल्यास संजय गांधी लाभार्थी यांचे समवेत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना वरोरा मिलिंद भोयर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा व विद्यमान संचालक राजेंद्र चिकटे, माजी सभापती पंचायत समिती वरोरा रवींद्र धोपटे व तालुक्यातील जवळपास 50 च्या वर निराधार लाभार्थ्यांची उपस्थिती होती.