गडचिरोली:-जिल्ह्यातील दक्षिण भागातील अहेरी,आलापल्लीत सध्या अवैध रेती तस्करी जोमात सुरू असल्याची बातमी झळकताच वन विभाग खडबडून जागे झाले असून दोन दिवसात चार ट्रॅक्टर जप्त केले.या कारवाईमुळे रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
या कारवाईत अमित माणिक राऊत,रा.अहेरी यांचे एक ट्रॅक्टर,श्रीनिवास मधुसूदन बोयमपल्ली,रा.अहेरी यांचे दोन ट्रॅक्टर आणि पोचन्ना रामय्या पोटा,रा.गेर्रा यांचा एक असे एकूण चार ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती अहेरीचे वन परिक्षेत्र अधिकारी आरती मडावी यांनी दिली.ही कारवाई अनुक्रमे 9 आणि 10 ऑक्टोबर ला पहाटेच्या सुमारास महागाव-अहेरी रस्त्यावर कक्ष क्रमांक 189 मध्ये करण्यात आली आहे.सदर कारवाई उपविभागीय वन अधिकारी रविकांत ढेंगरे, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आणि अहेरी, आलापल्लीचे वन कर्मचारी यांनी केली.
अहेरी आणि आलापल्ली शहरात सद्यस्थितीत एकही रेती घाट लिलाल झाले नसताना ही रेती येत आहे तरी कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून ‘अहेरी,आलापल्ली परिसरात रेती तस्करी जोमात’ या आशयावर बातमी प्रकाशित होताच वन विभागाने ही कारवाई केली. नुकतेच आलापल्ली येथे उपविभागीय वन अधिकारी म्हणून रुजू झालेले रविकांत ढेंगरे यांनी ही धडक कारवाई केल्याने सर्वत्र कौतूक केले जात आहे.सध्या वन विभागाने गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे.
महसूल विभाग केंव्हा जागे होणार?
अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन गस्त घालत दोन दिवस ही कारवाई केली.यावरून रात्रीच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्करी सुरू असल्याचे निष्पन्न झाले.असे असताना देखील महसूल विभाग का पुढाकार घेत नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.