गडचिरोली:- सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळख असलेल्या रेगुंठा उप पोलीस स्टेशन येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन १२ ऑगस्ट रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) यतीश देशमुख, सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे आदी उपस्थित होते.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यावर या ठिकाणी भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पोलीस प्रशासनातर्फे परिसरातील नागरिकांना विविध दाखले,जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा हा अहेरी निर्वाचन क्षेत्रातील गाव असून मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी रेगुंठा गावाला भेट दिली. या मेळाव्यात उपस्थित परिसरातील शेकडो नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधून समस्या जाणून घेतली.नुकतेच अतिवृष्टीमुळे या भागातील पक्के रस्ते,नदी,नाल्यावरील पूल वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ५ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयात सर्व विभागांचा आढावा घेतले होते.त्याच वेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्वरित दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.