मुंबई (कार्यालय) :- मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो, असे म्हणून एका ३३ वर्षीय विवाहितेला परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये बोलवले. त्यानंतर विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिक ढाकरगे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढायचे असल्याने ३३ वर्षीय विवाहित महिला माणिक ढाकरगे यांना भेटली होती. याचाच फायदा घेत आरोपी माणिक ढाकरगे याने शनिवार ५ ऑगस्ट रोजी महिलेला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील शारदा महाविद्यालयासमोर असलेल्या एका खोलीमध्ये तुझ्या मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढून देतो आणि तुझे कोतवालचे काम करतो असे सांगून बोलवले. यावेळी आरोपीने महिलेचे अश्लील फोटो काढून हे फोटो व्हायरल करतो, अशी धमकी विवाहितेला दिली.