औरंगाबाद : शासनाने ठरवून दिलेल्या महसूल वसूलीबाबत उदिष्ट पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी नियोजन करून उदिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठण तहसिल कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
अकृषक कर, तुकडेबंदी, शर्तभंग प्रकरण यांच्या बरोबरच अनधिकृत वाळू , मुरुम व इतर गौण खनिजाच्या चोरीबाबत दंडात्मक कार्यवाही केलेल्या वाळू वाहनांवरील दंड न भरलेल्या वाहनाची लिलावात विक्री करण्याच्या सूचना तहसिलदार यांना देण्यात आल्या व वसूलीबाबतच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत श्री.चव्हाण यांनी दिले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे. तहसिलदार निलावाड, पैठण तालुक्यातील मंडळ अधिकारी व सर्व तलाठी उपस्थित होते.
वसूलीच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या व उदिष्ट्यपूर्ती न करण्याऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहून काम करावे. महसूल वसूल कमी असणाऱ्या मंडळात लोकांना दंवडीच्या माध्यमातून आवाहन करावे.यासोबतच शेतरस्ते व पाणंद रस्त्याच्या बाबतीत अडचणी दुर करण्याबाबत सहकार्य बाबतही सूचना द्याव्यात असे सांगितले.
महसूल वसूलीत अनधिकृत बांधकाम, अकृषक कराची वसूली दगडखाणी किंवा गौण खनिजावरील कर, वाळू व मुरुम यांची रॉयल्टी, वीटभट्ट्या, व्यावसायिक हुरर्डा पार्टी, तुकडेबंदीवरील गुन्हे, शर्तभंग, फार्म हाऊस वरील कर व इतर महसूल वसूलीचा मंडळनिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला व याबाबत निर्देश दिले.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी रमेश सोनवणे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. तसेच चितेगावचे सिराज मोहमद कादर, मुरमा चे कल्याण पांडुरंग चिडे, कोळी बोडखाचे शेख युनुस इब्राहिम या अनधिकृत क्रेशर मालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीत दिले.