चक्रधर नगरमधील सदनिकाधारक आक्रमक
—
प्रतिनिधी बीड
बीड शहरातील चक्रधर नगर येथील विठ्ठल विश्व अर्पाटेमेंट या सहा इमारतींच्या व ७२ सदनिका धारकांनी बुधवारी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. रस्ता, नाली, पाणी व इतर मुलभूत सुविधा देण्यात याव्यात अन्यथा कुटुंबियांसह पालिका कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
बीड शहरातील चक्रधर नगर भागात विठ्ठल विश्व अपार्टमेंट ही वसाहत आहे. प्रत्येकी १२ सदनिका असलेल्या एकूण सहा इमारती इथे आहेत. मात्र, या परिसरात नगर पालिका प्रशासनाकडून कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. नाल्यांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे सदनिकाधारकांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला यातून परिसरातील नागरिक व सदनिका धारक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. शिवाय, मुख्य रस्त्यापासून इमारतीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात इथे मोठ्या प्रमाणावर चिखल होतो. यामुळे छोटे, मोेठे अपघात होता. अमृत योजनेतून अनेक सदनिका धारकांनी नळाची जोडणी घेतली आहे. मात्र, दोन, तीन वर्षे उलटूनही अद्याप पाणी पुरवठा झालेला नाही. पथदिवे नाहीत. सध्या चोरांच्या अफवा असताना या परिसरात अंधार आहे. या समस्या सोडवण्याची मागणी निवेदनातून केली आहे.त्यांच्या शिष्टमंडळाशी मुख्याधिकारी निता अंधारे यांनी चर्चा केली व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने सदनिकाधारक उपस्थित होते.