घुग्घुस: येथून जवळच असलेल्या नायगाव (बु.) येथील संतप्त विद्यार्थ्यांनी, पालकांनी गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी घुग्घुस बसस्थानकावर धडक देत बससेवेच्या समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
मागील पाच महिन्यापासून चंद्रपूर आगाराच्या बसेस यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील नायगाव मार्गे ये-जा करीत नाही आहे. त्यामुळे नायगाव येथील विद्यार्थ्यांना एक किमी. पर्यंत चंद्रपूर-यवतमाळ राज्य महामार्गांवरील बेलोरा फाट्यापर्यंत पायदळ सकाळी व सायंकाळी ये-जा करावे लागते. याचा विद्यार्थ्यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. नायगाव येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घुग्घुस शहरात यावे लागते यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्रासाठी पैसे भरून पास काढला आहे. बस ये-जा करीत नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मागील तीस वर्षापासून सर्वसाधारण बसेस नायगाव मार्गे सुरु होत्या. नायगाव लगत पाच गावे आहे येथून विद्यार्थी, अपंग, जेष्ठ नागरिक यांना शिक्षण, दवाखाना, बाजार करण्यासाठी घुग्घुसकडे ये-जा करावे लागते.
नायगाव मार्गे बस येत नसल्याने संतप्त झालेल्या १६ विद्यार्थ्यांनी, पालक व प्रवाश्यांनी घुग्घुस बसस्थानकावर धडक दिली. याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी तिकडे धाव घेतली.
माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी चंद्रपूर आगार व्यवस्थापनाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली व समस्या सांगितली त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तत्काळ समस्या न सोडविल्यास चंद्रपूर आगाराच्या बसेस यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील बेलोरा पुला जवळ थांबवू असा इशारा माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर यांनी दिला.
यावेळी पालक प्रतिनिधी श्रीराम राजूरकर, विठ्ठल ठाकरे, विद्यार्थी, पालक व प्रवासी उपस्थित होते.