अहेरी:-तालुक्यातील दामरंचा येथे सौर ऊर्जेवर आधारित उपसा सिंचन योजना द्वारे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे.या योजनेतून तब्बल दीडशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.त्यामुळे दामरंचा आणि भंगारमपेठा अश्या दोन गावातील शेतकरी आता सुजलाम सुफलाम होणार आहेत.13 डिसेंबर मंगळवारी आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रसंगी सह उदघाटक म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर,उप विभागीय जलसंधारण अधिकारी पी.जे.पुल्लावार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती इंदरशाह मडावी,माजी प स सदस्य राकेश पन्नेला,उपसरपंच गोपाल सुरमवार, प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ आलाम, बाबुराव तोर्रेम,श्रीनिवास झाडे,दिलीप आलाम, प्रकाश आत्राम,संतोष वेलादी, विस्तारी तलांडे,बंडू आत्राम,येलय्या सुरमवार,पापय्या सुरमवार,उमेश सिडाम,संजय सुरमवार,समय्या लिंगम आदी उपस्थित होते.
दामरंचा हे गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसले आहे.गावालगत बारमाही वाहणारे इंद्रावती आणि बांडे असूनही याचा कुठलाच फायदा शेतकऱ्यांना होत नाही.येथील शेतकरी बांधव वरच्या पाण्यावर कसेबसे एकदाचे पीक घेऊन मोकडे होतात.एकदाचे शेतीचे काम झाल्यावर हाताला काम नसल्याने येथील नागरिकांना कामासाठी इतरत्र भटकावे लागते.येथील शेतकरी समृद्ध व्हावा, दोनदा पीक घेता यावा, कामासाठी भटकंती थांबावी या उद्देशाने आ धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्नशील होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
सन 2019-20 मध्ये विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास विभाग कार्यालय,अहेरी तर्फे सौर उर्जेवरील उपसा सिंचन योजना राबविण्यात येत आहे.जलसंधारण विभागातर्फे पहिल्या टप्प्यात 6 कोटी रुपयांतून काम केले जाणार आहे.त्यानंतर जवळपास 10 कोटी रुपयांची निधी लागणार असून दामरंचा सोबतच भंगारमपेठा येथील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा दिला जाणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
*शेतकऱ्यांची वीज बिलातुन होणार मुक्तता*
उपसा सिंचन योजनांचा वीज बिलांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. या योजना सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारन निधी देण्याची मागणी वारंवार होते. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विजेचे सर्व फिडर, कृषी पंपांचे फिडर सौर ऊर्जेवर चालणार आहे.सौर पंप देनेऐवजी संपूर्ण फिडर सौर ऊर्जेवर देण्याची ही अभिनव योजना असून संपूर्ण उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्याचा शासनाचा विचार असल्याने आता शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता होणार आहे.
*बॉक्स—–*
1991 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो तेंव्हापासून उपसा सिंचन योजनेसाठी आपण प्रयत्नशील होतो.बरेच वर्षानंतर का होईना बांडे नदीवर हा उपसा सिंचन प्रकल्प होणार असून याचा फायदा अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेवटच्या टोकावर वसलेल्या दामरंचा गावातील शेतकरी बांधवाना होणार आहे.पहिल्या टप्प्याचे काम सुरू होणार असून जवळपास 6 कोटी रुपये शासनाने दिले आहे.परत 10 कोटी निधी लागणार असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहो. भंगारमपेठा गावातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार असून तब्बल दीडशे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे.
-आ धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र
*बॉक्स—-*
सौर उर्जेवरील उपसा सिंचन योजना शासनाची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून दीडशे हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे.सध्या आदिवासी विकास विभागातर्फे 6 कोटींचा अनुदान मिळालं असून आणखी जवळपास 10 कोटींचा अनुदान अपेक्षित आहे.
-पी जे पुल्लावार-उपविभागीय जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण उपविभाग, अहेरी