भद्रावती : भद्रावती येथील ऐतिहासिक भद्रनाग मंदिर प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून यामुळे शहरातील पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे असा आरोप एका पत्रकार परिषदेतून कॅटर्स संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
भद्रावती येथील ऐतिहासिक भद्रनाग मंदिरात शहरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून भावीक येथे नवस फेडण्यासाठी तथा मंदिरात स्वयंपाक करण्यासाठी येत असतात. मात्र अलीकडे मंदिर प्रशासनाने अनेक जाचक अटी लावल्यामुळे भाविकांना आपले धार्मिक कार्य मंदिरात करणे अडचणीचे झाले आहे.
पूर्वी मंदिरात स्वयंपाक करणे हे सहजतेने होत होते. त्यामुळे मंदिरात अनेक भाविक स्वयंपाकासाठी दररोज यायचे. मात्र मंदिर प्रशासनाने अलीकडे मंदिर परिसरात स्वयंपाक करू देणे बंद केले आहे. भाविकांना स्वतः स्वयंपाक करू न देता मंदिरातील कॅटर्स कडूनच करावा असा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भाविकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वयंपाक करताना भाविकांकडून किराया मागण्यात येतो. त्यामुळे लहान प्रकारचा धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण होत आहे. बाहेरचे कॅटरींग मंदिरात आणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे भाविकांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना त्यांच्या मनाजोगा कार्यक्रम करता येत नाही. मंदिरातील कर्मचारी हे भाविकांशी उद्धटपणे वागत असल्यामुळे भाविकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वयंपाक करण्यासाठी मंदिरातील सभागृह बंधनकारक करण्यात आल्यामुळे भाविकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हे सर्व आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेले आहेत. हे सर्व जाचक नियम लावण्यात आल्यामुळे शहरात तथा मंदिरात भाविकांचे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भद्रावती शहर हे पर्यटन नगरी असल्यामुळे या शहरात भाविक तथा पर्यटक मोठ्या आस्थेने येत असतात. मात्र मंदिर प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शहरातील पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून भद्रावती शहराचे पर्यटन धोक्यात आले असल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीसारखीच मुभा देऊन स्वेच्छेनुसार स्वयंपाक करू देण्यात यावा व त्यांच्यावर कोणत्याही जाचक अटी लादू नये जेणेकरून भद्रावती शहरातील पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. पत्रकार परिषदेला विशाल बोरकर, सतिश बोडणे, सचिन वासमवार, संतोष वासमवार, अमोल गावंडे, पुरूषोत्तम नैताम, संजय खंडाळकर, दिपक निकुरे, भुपेश कायरकर, प्रकाश कटलावार, दिलीप मडावी, विजय गारगाटे, रवी झुमरे, अमुर्त भालेराव, आनंद गुलगुंडे उपस्थित होते.
या संदर्भात मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता मंदिराचा अंतर्गत परिसर हा स्वच्छ राहावा व तेथे गोंधळ होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने काही बंधने घातली असली तरी वैयक्तिक स्वयंपाकासाठी कोणतेही निर्बंध नाही. मात्र जागेचा अभाव लक्षात घेता व भाविकांची संख्या लक्षात घेता थोडीशी गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी बाजूची नगर परिषदेची जागा देवस्थानाला मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. ही जागा मिळाल्यास त्या जागेवर मंदिर प्रशासन सर्व सोयी उपलब्ध करून भाविकांसाठी सुविधा देईल. असे त्यांनी सांगितले.