गडचिरोली:-आलापल्ली ते आष्टी 353 सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याने संतप्त जमावाने तब्बल 7 ते 10 ट्रक जाळल्याची घटना आज 26 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार अंजली सुभाष जयदार 42 रा.कांचनपूर ता.मुलचेरा हे आलापल्लीकडून कांचनपूर आपल्या गावाकडे आपल्या पतीसोबत दुचाकीने जात होती.शांतिग्राम जवळ दामपूर फाट्यावर ट्रक आणि दुचाकीत आपघात झाल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला खाली पडून जागीच ठार झाली आहे.
या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी या राष्ट्रीय महामार्गावर उभे असलेले तब्बल 7 ते 10 ट्रक जाळले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव घटनास्थळी आपल्या चमुसह दाखल झाले.घटनास्थळी अग्निशमनचे वाहन सुद्धा पाठविण्यात आले आहे.हे अपघात नेमकं कसं झाला याची अधिकृत माहिती नसली तरी अहेरीचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दक्षिण गडचिरोली भागात आलापल्ली ते आष्टी दरम्यान असलेल्या 353 सी या राष्ट्रीय महामार्गाची मागील काही दिवसांपासून अत्यंत दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने सुरजागड येथून लोह दगड घेऊन जाणारे जड वाहन नेहमीच खड्ड्यात फसत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे.परिणामी एसटी महामंडळाच्या अनेक बसेस मुलचेरा मार्गे वळविण्यात आले आहे.सध्या या रस्त्यावर वाहनधारकांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावं लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याने रस्त्यावरील खड्डे,प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या त्वरित सोडविण्यासाठी आलापल्ली आणि नागेपल्ली येथील व्यापारी संघटनेने 12 ते 14 सप्टेंबर पर्यंत बेमुदत मार्केट बंद ठेवले होते हे विशेष.मागील काही दिवसांपूर्वी आलापल्ली येथील मुख्य चौकात सुरजागड लोहखणीतील ट्रकने बसला धडक दिली होती. सुदैवाने प्रवाशांना काही झाले नसले तरी एसटी महामंडळचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.