गजानन देवाळकर मारेगाव :- महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते, लाखो युवकांचे प्रेरणास्थान , प्रखर विचारवंत, आपल्या प्रबोधनातून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रकाश टाकणारे कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते ह. भ. प. सोपानदादा कनेरकर यांचे मारेगाव येथे शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या उद्देशाने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव येथील नगरपंचायतच्या प्रांगणावर दि.15 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशात मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. या नेहमीच्या होणाऱ्या आत्महत्यासाठी यवतमाळ जिल्हा कुप्रसिद्ध आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात आठवड्यातून दोन ते तीन अशा आत्महत्या होत आहेत. शासन स्तरावरून या आत्महत्या थांबाव्या म्हणून कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही. यासाठी तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाने पहल करीत यासाठी पुढाकार घेत आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोपानदादा कनेरकर हे उच्च विद्या विभुषित आहे. त्यांच्या महान कर्यामुळे त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. तसेच मोटिवेशनल वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या व्याख्यान आणि कीर्तनाने भुरळ घालणारे व्यक्तिमत्व, तसेच कमी वयापासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सलोखा जोपासत वयाच्या 9 व्या वर्षांपासून प्रबोधनास सुरुवात करणारे सोपानदादा कनेरकर यांच्या व्याख्याणाला ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठया प्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा तसेच तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.