मुकेश जीवतोडे यांची मुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांच्याकडे तक्रार
वरोरा : तालुक्यातील सालोरी वन कक्ष क्रमांक-११ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पळसगाव (सिं) चे पुनर्वसन सण २०१९ मध्ये करण्यात आले. परंतु गेल्या तीन वर्षात आवश्यक मुलभूत सोयी सुविधा गावात पोहोचल्याच नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहे. परिणामी पुनर्वसनाच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पुनर्वसन मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व संबंधितांकडे निवेदन देऊन प्रकरणाच्या चौकशीची व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अभयारणण्या लगतच्या अनेक गावांना काही वर्षांपूर्वी ऊठवून त्यांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील ३५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पळसगाव (सिं) गावाचे पुनर्वसन सण-२०१९ मध्ये वरोरा तालुक्यातील सालोरी नजीकच्या वन कक्ष क्रमांक ११ मध्ये झाले आहे. पुनर्वसन करताना प्रकल्प बाधित ८९ कुटुंबांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यावर देण्यात आले होते. तसेच यासाठी आर्थिक तरतूद देखील शासकीय स्तरावर करण्यात आली होती. परंतु पुनर्वसन होऊन तीन वर्ष लोटले असताना पळसगाव (सिं) गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब असून ते सिमेंट काँक्रीटचे केलेले नाही. सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्या बांधलेल्या नाही. पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसून गावातील हातपंप देखील बंद आहे. शेतांमध्ये ओलित करण्यासाठी वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही. पुनर्वसन स्थळी आलेल्या लाभार्थ्यांना जमीन व शेतीचा लाभ अद्याप मिळालेला नाही नसून ७/१२ ऑनलाइन झाले नाही. शौचालय व गॅस ओटा बांधकाम केल्यानंतरही अनेक कुटुंबांना त्याची रक्कम मिळालेली नाही. मुख्य रस्त्यापासून तयार करण्यात आलेल्या पोहच मार्गाचे डांबरीकरण केले नसल्याने या रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना मुख्य मार्गावर येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसन कामात यांच्यासह अनेक त्रुटी असल्याने गावकरी संतप्त झाले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने यासंदर्भात प्रकल्पबाधितांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांना साकडे घालून न्याय देण्याची मागणी केली आहे. याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्व संबंधित मंत्री आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर तक्रारीतून त्यांनी पुनर्वसनावर झालेल्या खर्चाच्या चौकशीची आणि निकृष्ठ व प्रलंबित कामांची चौकशी मागणी करून त्यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच प्रकल्प बधित पुनर्वसित कुटुंबाला मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.