कृषिमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे तक्रार
वरोरा : तालुक्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांना बारदानाची कृत्रिम टंचाई निर्माण करून नाफेडच्या चणा खरेदीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रारीतून केला आहे.आपले उखळ पांढरे करण्यासाठी खाजगी व्यापाऱ्यांना फायदा करून देण्याच्या हेतून हा प्रकार झाला असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याचे मुकेश जीवतोडे यांनी म्हटले आहे. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दि १ मे २०२२ पासून शासकीय आधारभूत दराने नाफेडची चणा खरेदी सुरू झाली होती. यासाठी शेतकऱ्यांनी १७ मे पूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी योग्य मोबदला आणि वजन मिळत असल्याने नाफेडला शेतकऱ्यांची प्रथम पसंती होती. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे शेकडो शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी लाभापासून वंचित राहावे लागले आहे. नाफेडची चणा खरेदी सुरू करण्यापूर्वी किती बारदाना लागेल याचा अभ्यास करून तेवढी मागणी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी करणे व तो मिळविणे क्रमप्राप्त होते. तसेच खरेदी सुरू झाल्यानंतर पुढे आणखी किती बारदाना लागू शकतो याचा विचार करून वेळेपूर्वी बारदाण्याची मागणी बाजार समितीने करायला हवी होती. आणि जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी मागणीनुसार लगेच बारदाना पुरविणे आवश्यक होते. परंतु या सर्वच बाबतीत जाणीवपूर्वक दिरंगाई झाली नव्हे तर ती नियोजनपूर्वक केली गेली असल्याचा आरोप मुकेश जीवतोडे यांचा आहे. यामुळेच नोंदणीकृत व प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना नाफेडच्या लाभापासून वंचित राहावे लागले असल्याने त्यांच्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. परिणामी याचा फायदा उचलत नाफेडच्या १२६९०.५० क्विंटल खरेदीच्या तुलनेत व्यापाऱ्यांनी १ लाख ६५ हजार ७८८.७५ हजार क्विंटल चणा दि २ जून पर्यंत खरेदी केला आहे. यामुळे बाजार समिती ते जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशी साखळीच दोषी असून त्यांच्या कार्यप्रणाली मधून भ्रष्टाचाराचा गंध येत आहे.करिता या सर्वांची चौकशी करून कारवाई करावी आणि अन्यायग्रस्त चणा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.