चंद्रपूर प्रतिनिधी
पेट्रोल डिझेल पंपावर कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात याबाबत संपूर्ण राज्यात एकसारखेच नियम असायला हवेत मात्र त्यांच्या पात्रतेचे निकष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कसे काय चालवून घेतले जातात ,या सगळ्या प्रकारात नेमकं काय होतंय असा प्रश्न अ.भा.ग्राहक पंचायत च्या विदर्भ प्रांताने उपस्थित केला असून सगळीकडे तो सारख्याच अटिशर्थीने पाळला जावा अशी मागणी विदर्भ प्रांत पदाधिकारी यांनी उपस्थित केला आहे.
विदर्भ प्रांताच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील पेट्रोल डिझेल पंपावर भेट देऊन जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत पदाधिकारी यांनी तर त्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच नियमांचे पालन न करणाऱ्या या पेट्रोल डिझेल पंपावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
या पेट्रोल डिझेल पंपावर प्राथमिक सेवा ,तक्रार नोंदणी पुस्तकाचा अभाव , पावती न देणे , पिण्याच्या पाण्याची सोय नसणे , प्रसाधनगृह नसणे किंवा ते दूर असणे वा बंद असणे किंवा अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असणे , पेट्रोल डिझेल देताना ० न करता वाटप करणे ,हवा भरण्याची सोय नसणे किंवा बिघाड झाला आहे असे सांगणे वा तेथे कर्मचारी नसणे ,अशा अनेकविध समस्या आढळून आल्या आहेत.
पेट्रोल डिझेल पंपावर गर्दी झाली म्हणून घाईगडबडीत ०न करता पेट्रोल डिझेल वाटप करणे व नंतर ग्राहकांनी आरडाओरडा केला तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत ग्राहकांच्या मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचे काम केले जात आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी व ग्राहक हित जोपासण्यासाठी संघटनेच्या वतीने १०जूनपर्यंत सगळीकडे एक मोहीम राबविण्यात येत असून संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या भागातील वा प्रवासातील मार्गातील पेट्रोल डिझेल पंपावर भेट देऊन उपलब्ध सोयीसुविधा पडताळून तक्रार पुस्तिकेत त्याची चांगली वाईट नोंद करणार आहेत त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपावर चालकांनी ही तक्रार पुस्तीका उपलब्ध करून द्यावी व सहकार्य करावे न तरी ग्राहक व पदाधिकारी पंप संचालक वा कर्मचारी यांना लेखी तक्रार देऊन त्यांची प्रत जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्राहक पंचायत कार्यालय वा कार्यकर्त्यांना पाठवतील .
या तक्रारीची दखल घेत ग्राहक पंचायत संबंधितांकडे पाठपुरावा करणार आहे.
त्यामुळे ग्राहक हित जोपासण्यासाठी तातडीने अशा पंपावर कार्यवाही करीत सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याशिवाय हे पंप चालविण्यास परवानगी देऊच नये अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताचे अध्यक्ष नारायणराव मेहरे सचिव नितीन काकडे व संघटक अजय गाडे, महिला संघटक तृप्ती आकांत यांचेसह चंद्रपूर जिल्हा संघटक दीपक देशपांडे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते जिल्हा महिला आघाडी प्रमुख नंदिनी चुनारकर व संगीता लोखंडे , पुष्पा गोटे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.