वरोरा (सुरज घुमे )महारोगी सेवा समिती वरोरा संचालित सोमनाथ प्रकल्प येथे १५ मे ते २२ मे या दरम्यान श्रम संस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसीय या कार्यक्रमामध्ये चार राज्यातून आलेल्या शिबिरार्थींनी बौद्धिक शारीरिक व सांस्कृतिक मेजवानी चा आनंद घेतला. वृक्ष दिंडी व पंचमहाभूतांना आवाहन करून शिबिराची सांगता झाली. अस्थिर जगातून बाहेर पडून सोमनाथ प्रकल्प येथील श्रम कार्याच्या या विद्यापीठात नव्याने पदव्या घेऊन बाहेर पडण्याचा आनंद आणि एक दुसर्या सोबत मैत्रीची नाती सोबत घेऊन स्वतः मध्ये व समाजामध्ये आपले योगदान देण्याच्या प्रतिक्रिया शिबिरार्थींनी दिल्या.
या सात दिवसीय शिबिरात १५ मे रोजी संस्थेचे सचिव व छावणीचे संयोजक डॉ. विकास आमटे यांचे आनंदवन प्रयोगवन व संस्थेचा प्रवास या विषयावर सोबतच भारत जोडो सह्यात्री सोमनाथ रोडे यांनी मार्गदर्शन केले. १६ मे रोजी ऑयकॉस फॉर इकॉलॉजीकल सर्व्हिसेस च्या केतकी घाटे यांनी निसर्ग आणि आपण या विषयावर बोलताना, पर्यावरण शास्त्र पुन्हा पुनर्निर्मित करण्याची गरज आहे. निसर्ग स्वतामध्ये बदल कसा करत असतो आणि याच निरीक्षण करून आपण त्याचे जतन करणे हि काळाची गरज तर आहेच पण स्थानिक लोकांना सोबत घेऊन निसर्ग चक्राची पुनर्निर्मिती कारणे गरज आहे. प्रमाणात पर्यावरण संवार्धानाच्या नावाखाली एकाच प्रकराची निर्मिती करणे चुकीचे आहे. निसर्गामध्ये विविधता असायला हवी असे मत मांडले. १७ मे रोजी रिचरखा च्या प्रमुख अमिता देशपांडे यांनी कचरा समस्येचा सर्वात चांगला फायदा म्हणजे रोजगार निर्मिती आहे. शेकडो वर्षांसाठी बनलेली वस्तू आपण फक्त एका वापरासाठी वापरतो हे चुकीचे अर्थशास्त्र आहे. या क्षेत्रातून निर्माण होणारे उत्पन्न जरी कमी असले तरी मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. आपणच आपले राहणीमान बदलने गरजेचे आहे असा संवाद साधला. चर्चेवेळी शिबिरार्थीनी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी विविध मुद्यांवर पर्याय शोधून तसे वागण्याचसाठी स्वतःला प्रेरित केले. सोबत अनिकेत आमटे यांनी बाबांची तिसरी पिढी म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वांसारखेच करत असतो. महारोगी सेवा समितीचे काम म्हणजे कार्यकर्त्यांच्या सामुहिक प्रयत्नांचा अविष्कार आहे. त्यामुळे हे काम फक्त एकट्या आमटे परिवाराचे नसून सर्वांचे आहे. मर्यादा आखून काम करणे खूप गरजेचे आहे आणि आम्ही ते काटेकोरपणे पाळतो. त्यामुळे हे शास्वत सुरु आहे.
१८ मे रोजी गुंज आणि ग्राम स्वाभिमान संस्थेचे रेमन मॅगसेसे विजेते अंशू गुप्ता यांनी समस्यां शोधण्यापेक्षा आपण उतरांवर काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती हि सामाजिक समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी मदत करू शकते. एकत्र येऊन कार्याला सुरवात केली तर सरकारच्या अयशस्वी योजनांची गरज पडणार नाही. लोकांसाठी काम करत असताना त्यांचा आत्मसन्मान टिकवता आला पाहिजे. भौगोलिक परिस्थितीत चा अभ्यास करून गरज ओळखली पाहिजे. लोकांना तेच द्यायला हवं ज्याची गरज आहे. जसे कि शिक्षणासाठी काम करायचं आहे तर आधी शेतीसाठी पाणी आणने महत्वाचे आहे म्हणजे स्थलांतर कमी होऊन मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होईल. या विषयावर चर्चात्मक संवाद साधला. १९ मे रोजी ट्रंक कॉल दि वाईल्ड लाएफ फौंडेशन चे आनंद शिंदे यांनी हत्तीं सोबत संवाद या विषयावर संवाद साधला. हत्ती वाचले तर निसर्ग वाचेल, जशी आपण त्यांच्याशी मैत्री करू तसेच तेही आपल्यासोबत घट्ट मैत्री करतात. निसर्ग म्हणजे यशस्वी होणे हे आपल्याला शिकवलेच नाही. तरुणांसाठी बोलताना म्हणाले कोणतेही काम करताना जरी आपल्याला काम यशस्वी नाही करता आले तरी चालेल पण हार मानायची नाही. हत्ती सोबत काम करत असतानाचे हत्ती अनुवांशिक स्मृतीन्द्वारे कार्य कसे करतात, प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी शिक्षण आणि प्राण्यांसाठीची सर्वात महत्वाचे ध्यानधारणा उपचार म्हणजे त्यांच्याशी संवाद साधने याबद्दलचे अनुभव व्यक्त केले. २० रोजी लेखक व यशस्वी उद्योजक मंदार भारदे यांनी स्वप्न या विषयावर अभिव्यक्ती, भावना, प्रेरणा, जिद्द, आणि यशस्वी या विषयांवर संवाद साधला. सोबत व्यक्तिमत्व विकास अभ्यासक संजय साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले. २१ मे रोजी कौस्तुभ आमटे व पल्लवी आमटे यांनी सामाजिक क्षेत्रातल्या नवनवीन संधी आणि त्यासाठीची लागणारी अभ्यासपूर्ण तयारी या विषयावर शिबिरार्थीं सोबत प्रश्न- उत्तरात्मक संवाद साधला. पर्यावरण पूरक वृक्षलागवडीच्या तयारीसाठीच्या श्रमदान गतीविधी, प्रबोधन सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, योगा, खेळ, चर्चासत्रे आदी विषयांसह छावणी संपन्न झाली. या प्रसंगी डॉ. विकास आमटे, भारती आमटे, सोमनाथ रोडे, भारत जोडो सहयात्री जेकब, कौस्तुभ आमटे, मंदार भारदे, पल्लवी आमटे, जगदीश पुराणिक, अरुण कदम आदी मान्यवर उपस्तीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार छावणीचे समन्वयक रवींद्र नलगिंटवार यांनी केले.