चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, व भद्रावती पंचायत समिती सदस्य नागोराव बहादे यांचे नेतृत्व
भद्रावती :
स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. भद्रावती र.न. ८५७ च्या निवडणूक प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, चंदपूर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, व भद्रावती पंचायत समिती सदस्य नागोराव बहादे यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर सहकार पैनलचा विजय झाला आहे. आज (दि.२२) ला पार पडलेल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेनंतर काही वेळातच मतमोजणी होवून निकाल जाहीर झाला असून शेतकरी शेतमजूर सहकार पैनलच्या तेराही उमेदवारांचा विजय झाला.
विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५२ (अ) अंतर्गत दाखल अपील अर्जावर ५ मे ला निर्णय होवून शेतकरी शेतमजूर सहकार पॅनलचे पाच उमेदवार यापूर्वीच अविरोध निवडून आले होते.
या निवडणुकीत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वातील शेतकरी परिवर्तन पॅनल व रवि शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी शेतमजुर सहकार पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात आमने सामने होते.
विजयी पैनल मध्ये सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून भद्रावती येथून अरूण सदाशिव घुघुल, रोहन कवडू खुटेमाटे, गवराला व चिरादेवी येथून ज्ञानेश्वर राजाराम डुकरे, ढोरावासा येथून सतिश मधु वरखडे, बरांज, किलोनी व कढोली येथून अजित निळकंठ फाळके, कुणाडा, तेलवासा व चारगाव येथून विश्वास पुरुषोत्तम कोंगरे, चेकबरांज, घोटनिंबाला, सुमठाना, पिपराबोडी, खापरी येथून नरेश दुर्योधन काळे, देऊलवाडा येथून प्रेमदास कान्होबाजी आस्वले, अनुसूचित जाती/जमाती या गटातून भारत गोसाई नगराळे, इतर मागासवर्गीय गटातून रामचंद्र संभाजी वांढरे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून साहेबराव उधवराव घोरुडे, महिला राखीव गटातून सुषमा श्रीनिवास शिंदे, मनीषा राजू सातपुते असे एकूण १३ उमेदवार निवडणूक आले आहेत.
यापैकी अजित फाळके, विश्वास कोंगरे, नरेश काळे, प्रेमदास आस्वले, भारत नगराळे हे आधीच अविरोध निवडल्या गेले होते तर इतर अरुण घुगुल, रोहन कुटेमाटे, सतीश वरखडे, ज्ञानेश्वर डुकरे, रामचंद्र वांढरे, साहेबराव घोरूडे, मनीषा सातपुते, सुषमाताई श्रीनिवास शिंदे हे उमेदवार आज मतदान प्रक्रियेतून निवडून आले.
यावेळी विजयी सभेत बोलतांना रवि शिंदे म्हणाले की, अखेर लोकशाही जिंकली, साम दाम दंड भेद निती हरली आहे. शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावात येवून बिनबुडाचे आरोप केले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलने प्रस्थापित जिल्हा बँकेचे संचालक व पॅनलधारक कुठेतरी आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा खोटा आरोप केला होता. दरम्यान भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये जाऊन शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी लोकप्रतिनिधीसह धिंगाणा घातलेला होता. व्यवस्थापक ठाकरे यांना मारहाण केलेली होती. अपीलीय अधिकारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा सतत दबाव होता. त्यानंतर उमेदवारी खारीज करण्याच्या शेवटच्या घटकेदरम्यान शेतकरी परिवर्तन पॅनलच्या व काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षसह इतर तिघांनी निवडणुक प्रक्रियेतील महत्त्वाची फाईल चोरली. ही सर्व बाब अत्यंत गंभीर व लोकशाही विरोधी होती. याउलट शेतकरी शेतमजुर सहकार पॅनल घटनेच्या अधीन राहून लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे गेले. कोणताही अनुचित प्रकार आम्ही केला नाही. निवडणुकीतील विजयाने शेतकरी परिवर्तन पॅनलचे पितळ उघड झाले आहे. शेवटी सत्याचा विजय झाला असल्याचे रवि शिंदे म्हणाले.
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, घटनात्मक कामकाजात हस्तक्षेप करणे म्हणजे लोकशाहीला तडा देणे होय व ही काँग्रेस पक्षाची संस्कृती नव्हे. या निवडणुकीत केलेल्या सर्व दादागिरीपूर्ण कृत्याचा जनता भविष्यात नक्कीच विचार करेल.
सोबतच धनशक्ती व दादागिरीच्या शक्तीला मतदान रुपी हरविल्या बद्दल मतदाराचे जाहीर आभार रवि शिंदे व नागो बहादे यांनी मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी रवी मांडळकर यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविली.
रवींद्र शिंदे, नागो बहादे, भास्कर ताजने, गणेश जीवतोडे, महेश झाडे, मारोती निखाडे, अशोक निखाडे, बाबा आस्वले, सत्तार भाई, राजू सातपुते, गजानन आस्वले यांचे या विजयात परिश्रम आहे.
–————————————-
————————————–सदर निवडणुकीची आतापर्यंतची पार्श्वभुमी पाहता या निवडणुकी संबंधात दिनांक १९ एप्रिल रोजी भद्रावती पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा क्रमांक २७७/२२ कलम ५०४, ५०६ भांदवि तसेच दिनांक २० मे रोजी अपक. १६६/२२ कलम ३९२,३५३,३४२.३४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एखाद्या सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रथमच अशाप्रकारच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. खासदार व स्थानिक आमदार स्वतः मतदान केंद्रासमोर दिवसभर ठाण मांडून होते. खासदार बाळू धानोरकर व जिल्हा बँकेचे संचालक रवि शिंदे या दोघांच्याही प्रतिष्ठा या निवडणुकीत लागून होत्या. त्यात रवि शिंदे यांनी बाजी मारली व सहकार क्षेत्रातील शिंदे हे मुरब्बी नेतृत्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रवि शिंदे यांनी कोरोना लाटेच्या काळापासून गावागावात जावून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, वन्यजीव मानव संघर्ष, सहकार व सामाजिक क्षेत्रात २४ तास काम केले. सतत जनसंपर्क ठेवून जनतेच्या अडचणी दूर केल्या. विनम्र स्वभाव व घटनात्मक विचारांनी कार्य करीत राहिले, याची फलश्रुती म्हणून या विजयाकडे बघितल्या जात आहे.
धानोरकर व शिंदे यांच्यातील राजकीय वैमनस्य आता सर्वशृत झाले आहे. धानोरकर यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे यांनी खिंडार पाडायला सुरवात केली आहे. तर रवि शिंदे यांना टार्गेट करीत जिल्हा बँकेविरोधात धानोरकर यांची पाऊले पडत आहेत. या सर्व प्रकारात तूर्तास जरी रवि शिंदे सरस ठरले असले तरी पुढे धानोरकर यांची पुढची रणनीती काय असेल, याकडे राजकीय व सहकार क्षेत्रातील जाणकार लक्ष ठेवून आहेत.