गडचिरोली:-राज्याच्या पूर्व टोकावर छत्तीसगड सीमेला लागून असलेला आणि जंगलांनी व्यापलेला भामरागड तालुक्यातील डोंगराळ भाग म्हणजे अबुजमाड. नक्षल्यांचा सहज वावर असणाऱ्या या परिसरात पक्के रस्ते नसल्यामुळे चारचाकी वाहनाने पोहोचणेही एक आव्हान ठरते. अशा या अति मागास भागात कनिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या चमुला सोबत घेऊन गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अबुजमाड परिसरातील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेत मान्सूनपूर्व तयारी करून घेतली.
भामरागड तालुक्यातील लाहेरी पर्यंत सहज प्रवास होऊ शकते मात्र, पावसाळ्यात गुंडेनूर नदीला पूर असल्याने या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. सर्वाधिक मागासलेला हा भाग येथे जायला रस्ता नाही, गावात वीज नाही, रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने खाटेवरून रुग्णांना रुग्णालयात आणले जाते.त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात मान्सून पूर्व तयारी म्हणून गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी अबुजमाडच्या जंगलात पोहोचले.बिनगुंडा नंतर तब्बल 10 किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायी प्रवास करून पोदेवाडा गावातील परिस्थिती अनुभवली. चक्क अबुजमाड मध्ये जाऊन आदिवासी नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेणारे पहिलेच आय ए एस अधिकारी ठरले.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयपासून तब्बल 250 किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा पर्यंत मोजकेच अधिकारी पोहोचतात. कारण,लाहेरी नंतर गुंडेनूर नदी पलीकडील गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते,नदी-नाल्यावर पूल नाही.एवढेच नव्हेतर हा परिसर नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी सेवा देणे म्हणजे काळ्या पाण्याची सजाच वाटते. पावसाळ्यात या भागात एकही कर्मचारी पोहचू शकत नाही.त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवल्यास,गरोदर मातांना प्रसूतीसाठी कमरेभर पाण्यातून खाटेवर घेऊन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्याशिवाय पर्याय उरत नाही,अश्या परिस्थितीत वेळेवर उपचाराअभावी अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला.अश्या परिस्थितीत पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावातील नागरिकांना प्रथमोपचारासाठी अडचण येऊ नये यासाठी आशा वर्कर सोबत गावात एका सुशिक्षित युवकाची नियुक्ती करून त्याला मार्गदर्शन करण्यात आले.एवढेच नव्हेतर स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी आणि विशेष म्हणजे आरोग्य विभागाला 24 तास अलर्ट राहण्याचे निर्देश दिले.
बॉक्स——-
मान्सूनपूर्व तयारी म्हणून लाहेरी,बिनागुंडा आणि पोदेवाडा येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतली.या भागात मलेरियाचे रुग्ण आढळले.त्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.तापाचे लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य सेविका,आशा वर्कर यांना संपर्क करून वेळेवर औषधोपचार घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी तलाठी,ग्रामसेवक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले.
गावात विजेची समस्या प्रखरतेने जाणवली मात्र,प्रत्येक घरी सौर ऊर्जेचे पॅनल बसविल्याने विजेची समस्या तात्पुरत्या स्वरूपात मिटली.गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असून जलजीवन मिशन अंतर्गत सोलार दुहेरी नळयोजने द्वारे दिसेम्बरच्या शेवटपर्यंत पाण्याची सुविधा करण्यात येणार आहे.
-कुमार आशीर्वाद
मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली