१ जून २०२२ पासून चिचडोह बॅरेजचे सर्व द्वार उघडणार.
पोंभुर्णा:- तालुक्यातील गावांना चिचडोह बॅरेजच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करण्याबाबत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून लघु पाटबंधारे विभागाने वार्षीक द्वार संचालन कार्यक्रम २०२२ तयार केला असून त्यानुसार १ जून २०२२ पासून चिचडोह बॅरेजचे सर्व द्वार उघडण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातुन पोंभुर्णा तालूक्यातील गावांना चिचडोह बॅरेजच्या माध्यमातुन नियमित पाणी पुरवठा होणार आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे पाणी पुरवठयाच्या ५ मोठया टाक्या आहेत. ज्यामध्ये पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचा समावेश आहे. यामधुन एकूण २६ गावांना पाणी पुरवठा होत असतो. चिचडोह बॅरेजमधून गेल्या १५ दिवसापासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे पोंभुर्णा तालुक्यामध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूरच्या निदर्शनास आणली. चिचडोह बॅरेजमधून पोंभुर्णा तालुक्यातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन यश प्राप्त झाले असून १ जून २०२२ पासून चिचडोह बॅरेजचे सर्व द्वार उघडण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
चिचडोह बॅरेजचा सद्यःस्थितीत पाणी साठा ६.०३३ द.ल.घ.मी. असून गोसीखुर्द प्रकल्पातुन येणारा विसर्ग शुन्य असल्याने ४.५ घ.मी./से. विसर्ग सुरू होता. आ. मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने दिनांक १४ मे २०२२ पासून १६.७० घ.मी./से. विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग कमी पडल्यास गाव कार्याच्या मागणीनुसार विसर्ग वाढविण्यात येईल असेही विभागाने कळविले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातुन पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे.