भद्रावती : अलिकडे शेतात मोठ्या प्रमाणावर रासायनिक खताचा वापर होत असल्यामुळे उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी रासायनिक खताचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचे लक्षात यायला लागले आहे. मानवी जीवनावरील रासायनिक खताचा दुष्परिणाम टाळायचे असेल तर सर्वांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे आवाहन पुणे येथून आलेले पंढरीनाथ चंदनखेडे यांनी केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित “शेतीचे व्यवस्थापन व गाईचे महत्व” या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. प्रमुख उपस्थिती प्रा. धनराज आस्वले व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे यांची होती. पुढे बोलतांना श्री चंदनखेडे म्हणाले की, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत गाय ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत असते. म्हणून आपण तिला गोमाता म्हणतो. या गोमातेचे महत्त्व आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे असे सांगत त्यांनी गाईचे महत्व विस्तृतपणे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय टोंगे, संचालन रमेश पारेलवार, आभार प्रा.अमोल ठाकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ.जयवंत काकडे, डॉ. सुहास तेलंग, डॉ. गजानन खामनकर,प्रा. संगीता बांबोळे, प्रा.मोहीत सावे, डॉ. यशवंत घुमे यांच्यासह अनेक नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.