संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रयत्नांना यश; नगर परिषदेकडून पाण्याची व्यवस्था
वरोरा : शहरातील कमला नेहरू प्रभागातील चिरघर प्लॉट येथील खुल्या पटांगणात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अखेर बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाली आहे. श्री संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने मागील आठ महिन्यांपासून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी बोअरवेलचे भूमिपूजन करण्यात आले.
चिरघर प्लॉट परिसरातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद वरोरा प्रशासनाकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केला होता. अखेर नगर परिषदेकडून या मागणीची दखल घेत खुल्या पटांगणात बोअरवेलची व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष अर्चनाताई आशिष ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, पाणीपुरवठा विभागाचे सभापती गजानन जीवतोडे, नगरसेवक गजानन मेश्राम, बंडू देऊळकर, मंगला पिंपळकर, सीमाताई तडस, कुणाल रुयारकर तसेच नगर परिषद वरोराचे अभियंता कांबळी उपस्थित होते.
यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, श्री संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.












