मूल प्रतिनिधी : मूल तालुक्यातील भेजगाव येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेस आणि भाजपला धक्का दिला. दोन्ही पक्षांतील शेकडो कार्यकर्ते आणि युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे.
जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विपुल गोंगले यांच्यासह काँग्रेस व भाजपमधील शेकडो कार्यकर्ते आणि युवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
भेजगाव परिसरात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मूल तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्षसंघटना गावागावांत अधिक मजबूत करण्यासाठी नवप्रवेशित कार्यकर्ते सक्रियपणे काम करणार असल्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे भेजगाव परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला संघटनात्मक बळ मिळाले असून, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात आहे.












