वरोरा : अवैधरीत्या डिझेलचा साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात वरोरा पोलिसांनी धडक कारवाई केली. मौजा पांजुर्णी येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५ लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १,८०० लिटर ज्वलनशील डिझेल, नऊ मोठे प्लास्टिक ड्रम, डिझेल मोटर पंप, डीसी ऑईल पंप आणि डिझेल वाहतुकीसाठी वापरली जाणारी स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरच्या रात्री वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नंदकिशोर खनके, पोलीस हवालदार संदिप मुळे आणि पोलीस अंमलदार मनोज ठाकरे हे गस्तीवर होते. यावेळी पांजुर्णी येथे एका व्यक्तीने विक्रीच्या उद्देशाने अवैधरीत्या ज्वलनशील डिझेलचा मोठा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. घराची झडती घेतली असता पहिल्या खोलीत निळ्या रंगाचे नऊ मोठे प्लास्टिक ड्रम आढळून आले. पंचांसमक्ष ड्रमची तपासणी केली असता त्यामध्ये ज्वलनशील डिझेल असल्याचे आढळून आले.
या कारवाईत नऊ ड्रममधील अंदाजे १,८०० लिटर डिझेल, किंमत १ लाख ८० हजार रुपये, १२ व्हॅट क्षमतेचा डिझेल मोटर पंप किंमत ११ हजार रुपये, एक डीसी ऑईल पंप किंमत ६ हजार रुपये तसेच एमएच ३१ सीआर २३५५ क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार किंमत ४ लाख रुपये असा एकूण ५ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सुचिंद्र कलमे (वय ३०, रा. लोनगाडगा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत असून, या अवैध डिझेल विक्रीच्या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
पांजुर्णी येथे झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध डिझेल विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.










