एटापल्ली : अनियमित पाऊस, पावसातील दीर्घ खंड, अतिवृष्टी तसेच खरीप पिकांवरील रोगराई व कीड प्रादुर्भावामुळे एटापल्ली तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी तातडीने गावनिहाय वस्तुनिष्ठ पीक सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
एटापल्ली तालुक्यातील बहुतांश शेतकरी शेतीवर अवलंबून असून यंदाच्या हंगामात पावसाच्या लहरीपणाचा मोठा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही ठिकाणी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातच भातासह इतर खरीप पिकांवर रोगराई आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
केवळ पर्जन्यमानाची आकडेवारी नको, प्रत्यक्ष पीक परिस्थिती तपासा, अशी भूमिका CPI व किसान सभेने मांडली आहे. पावसातील खंड, अतिवृष्टी, पीक नुकसान, जमिनीतील ओलावा, रोगराई, कीड प्रादुर्भाव आणि अपेक्षित उत्पादनातील घट या सर्व बाबींचा विचार करून गावनिहाय सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी. पात्र शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच आवश्यक बियाणे, खते आणि रोग-किड नियंत्रणासाठी कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, दुष्काळ मूल्यांकनासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार एटापल्ली तालुक्याची तपासणी करून पात्रतेनुसार दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. तसेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आणि शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली.
“पीक नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. शासनाच्या निकषांनुसार एटापल्ली तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास CPI व AIKSच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा CPIचे जिल्हा सहसचिव तथा AIYF महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी दिला.
यावेळी कॉम्रेड सुरज जककुलवार, कॉम्रेड रितेश जोई, देवराम नरोटे, परशुराम नैताम, दशरथ पोटावी, मनकु मटामी यांच्यासह CPIचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन पीक सर्वेक्षण व पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी CPI व ऑल इंडिया किसान सभेच्या वतीने करण्यात आली.










