अहेरी : अहेरी तालुक्यातील कोलपल्ली येथे पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत तब्बल ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन अहेरीच्या पथकाने १८ सप्टेंबर रोजी दुपारी २.५० ते ४.१० वाजताच्या सुमारास कोलपल्ली परिसरात कारवाई केली. एका संशयिताच्या राहत्या घराची पाहणी केली असता घराच्या पहिल्या खोलीत पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये हार्यवर्ड ५००० कंपनीचे १४४ बिअर कॅन, रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या २,३०० निपा आणि ऑफिसर्स चॉईस कंपनीच्या १३२ बाटल्या, असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा आहे.
याप्रकरणी दिवाकर बाना गावडे (४२, रा. कोलपल्ली) याच्यासह संपत पोचा आईलवार (४२, रा. कोलपल्ली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविष्कार गुंजाळ करीत आहेत.













