सुमित हेपट मारेगाव :- शहरात जय भीम उत्सव समितीच्या वतीने ता.११ ते१४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शहरात निळ्या वादळात साजरी करण्यात आली.
ता.११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम येथील धम्मराजीका बुद्ध विहार येथे घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते अभिषेक हेपट यांनी भगवान गौतम बुद्ध,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर प्रकाश टाकत,जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे सांगितले.ता.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता फुले शाहू आंबेडकरी गीतांचा बुलंद आवाज भीमेश भारती यांचा कव्वालीचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला.१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वक्ते किशोर चहांदे यांनी “स्त्री मुक्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर सायंकाळी ८ वाजता येथील शेतकरी सुविधाच्या हॉल मध्ये स्वरधारा प्रस्तुत “हम भीम दिवाने” हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख गायक वासुदेव धाबेकर,मुकेश कुमार,निकिता गोवर्धन,नागेश रायपुरे व निवेदक साहिल दरने यांनी सादर केलेल्या बुद्ध भीम गीतांनी उपस्थिताना मंत्र मुग्ध केले. तर १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या पुतळ्याला अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.व सायंकाळी ७ वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह ढोल ताश्याच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ता.११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
(बॉक्स)* राष्ट्रिय एकात्मतेचे घडले दर्शन*
भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आले.यात १० एप्रिल रोजी सायंकाळी येथील आंबेडकर चौकात राम नवमी च्या भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले.व शोभायात्रेतील रामभक्तांना शरबत व थंड पाण्याचे चे वाटप करण्यात आले.तसेच १४ एप्रिल रोजी येथील मस्जिद मध्ये रमजानचे रोजा असलेल्या मुस्लिम बांधवाना फळे वाटून रोजा इफ्तार देण्यात आल्याने राष्ट्रीय एकात्मता घडुन आली.