गडचिरोली:-नक्षल्यांनी दोन आदिवासी युवकांची हत्या केल्याची घटना घडली असून मंगेश मासा हिचामी वय 27 रा.झारेवाडा पोस्ट गट्टा (जंभिया) ,नवीन पेका नरोटे वय 25 रा.गोरगुट्टा पोस्ट गट्टा (जंभिया) हे दोघेही एटापल्ली तालुक्यातील असून पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार काल 13 एप्रिल रोजी मंगेश हिचमी यास रात्री 10 वाजता तर, नवीन नरोटे यास रात्री 01 वाजता नक्षल्यांनी घरातून बळजबरीने घेऊन गेले व त्यांची हत्या केली.या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर आणून ठेवले तर,नवीन नरोटे याचे मृतदेह गोरगट्टा ते गिलनगुडा रस्त्यावर आणून टाकले.आज त्या दोघांचे मृतदेह रस्त्यावर आढळून आल्यावर परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सर्वात मोठा लोह खदान असलेल्या सुरजगड येथे कालच नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाचा 12 तासांचा कालावधी उलटन्याआधीच त्याच परिसरात नक्षल्यांनी दोघांची हत्या करून दहशत निर्माण केला आहे.
या घटनेवरून बरेच दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. सदर घटनेनंतर या परिसरात नक्षल मोहीम तीव्र करण्यात आले आहे.