अहेरी: राष्ट्रीय महामार्गावरील उमानूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील मरपल्ली गावातील बीएसएनएल मोबाईल टॉवर मागील दहा दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मरपल्ली येथे पोलिस ठाणे, जिल्हा परिषद शाळा, विविध विभागाचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण वास्तव्यास आहेत. शासकीय कामकाज, ऑनलाइन व्यवहार, बँकिंग सेवा, शैक्षणिक उपक्रम आणि दैनंदिन संपर्कासाठी बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
उमानूर परिसरात आधीच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायम आहे. त्यातच बीएसएनएल टॉवर बंद पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. उमानूरलगतच्या अनेक गावांतील नागरिकही याच नेटवर्कवर अवलंबून असल्याने संपूर्ण परिसर संपर्कविहीन झाला आहे.
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र नेटवर्कच उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पोलीस किंवा अन्य तातडीच्या सेवांशी संपर्क साधताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मरपल्लीसह परिसरातील नागरिकांनी संबंधित बीएसएनएल विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन बंद पडलेला टॉवर त्वरित सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.













