भामरागड प्रतिनिधी : भामरागड तालुका मुख्यालयापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या आरेवाडा मुख्य रस्त्यावरील मोरीच्या बांधकामातील पाईपमध्ये लपवून ठेवलेला तब्बल २ लाख ६३ हजार रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा भामरागड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जप्त करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
भामरागड परिसरात बाहेरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सतर्कता बाळगत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, शनिवारी सकाळी सुमारे १०.२५ वाजताच्या सुमारास आरेवाडा रस्त्यावरील मोरीच्या पाईपमध्ये पोत्यांमध्ये अवैध दारू लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोरीच्या पाईपमधून बाहेर काढलेल्या पोत्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये रॉकेट संत्रा कंपनीच्या प्रत्येकी ९० मिली मापाच्या देशी दारूच्या एकूण २ हजार ६३० बाटल्या आढळून आल्या. या दारूची एकूण किंमत २ लाख ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून तो पुढील कारवाईसाठी भामरागड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा अवैध दारूसाठा तारा सनातन बाला, केये मुसरा उसेंडी आणि करण वेलादी यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, पोलीस हवालदार जयंत पुडो, प्रफुल चव्हाण, आकाश उईके तसेच पोलीस अंमलदार राहुल पारेल्लीवार, अवनीत गव्हारे, विक्रांत शिंदे, अनिल चिप्पडी आणि गणश्री इटकलवार यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
अवघ्या तालुका मुख्यालयाजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आल्याने दारूबंदी असलेल्या भागात सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीचे जाळे किती सक्रिय आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणाच्या सखोल तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













