बार्शी अमीन गोरे :- तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे बोगस डॉक्टरकडून करण्यात आलेल्या कथित चुकीच्या उपचारामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मृत व्यक्तीचे नाव तानाजी नरहरी सुतार (वय 58) असे असून त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार हरपल्याने नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोगस डॉक्टरने केलेल्या अयोग्य उपचारांमुळे तानाजी सुतार यांची प्रकृती अधिकच खालावली. योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी आरोग्य प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे.अंतिम अहवालानंतर संबंधित बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात बिनपरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.













