गडचिरोली: आलापल्ली वनविभागात सागवानाच्या तस्करीचा गोरखधंदा सुरू असल्याचा ताज्या घटनेने उघड झाला आहे. घोट वनपरिक्षेत्राच्या सतर्क कारवाईमुळे प्लास्टिक भंगाराच्या चुंगळ्याखाली लपवलेले १३ सागवान लाकडे जप्त झाली.वनविभागाने १९ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असला तरी गुन्हेगारांना पकडता न आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
१० जानेवारी २०२६ रोजी रात्री घोट वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर सर्जेराव वाडीघरे यांच्या नेतृत्वाखालील वनकर्मचारी गरंजी जंगलात गस्तीवर होते. तेवढ्यात (सीजी ०७ सीटी ६७३५) चारचाकी वाहन आणि एक मोटारसायकल संशयास्पद वर्तन करताना दिसली. त्या चारचाकी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ती शासकीय वाहनाला कापून वेगाने कोटमी गावाकडे पळ काढली. पाठलाग करून कोटमीत कार थांबवली तेव्हा त्यातील दोन इसम उतरून पळून गेले. मोटारसायकलवरील तिघेजणही निघून गेले.त्या वाहनाची तपासणी केली असता, प्लास्टिक भंगाराच्या चुंगळ्याखाली सागवान प्रजातीचे १३ लाकडे सापडली. (घनमीटर ३.४२७ इतक्या लाकड्यांची किंमत ४ लाख ८९ हजार ९४९ रुपये) तर वाहनाची अंदाजे १५ लाख रुपये असा एकूण १९ लाख ८९ हजार ९४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हा प्रकार उघड झाल्याने आलापल्ली वनविभागात सागवान तस्करीचा गोरखधंदा सुरू आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.सदर कारवाई उपवनसंरक्षक दीपाली तलमले, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली घोट वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पार पडली. यात व्हि. एम. ठाकरे, वि. डी. सावळे, एन. वी. गावडे, जि. सी. राठोड, एस. बी. राठोड, एस. पी. धानोरकर, मंगेश कावेवार, कमलाकर चौधरी, वाहनचालक प्रविण श्रीखंडे, आलम आणि जीवन विटपल्लीवार यांचा सहभाग होता. घोट वनपरिक्षेत्राने हे धाडस दाखवले तरी आलापल्ली विभागात अशा प्रकारच्या तस्करीला आळा बसला नाही, हे चिंताजनक आहे.
सागवान कोणत्या जंगलात कापले?
घोट वरपरिक्षेत्र कार्यालयाने केलेल्या या कारवाई मुळे तस्करांचे धाबे दणाणले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात असले तरी १३ सागवान लाकडे घोट वनपरिक्षेत्रातील गरंजी किंवा कोटमी जंगलातूनच कापले गेले का? की आलापल्ली वनविभागातील इतर संरक्षित भागांतून? वाहनातून प्लास्टिक भंगाराच्या खाली लपवून कोटमीमार्गे बाहेर पाठवले जात असल्याने स्पष्ट दिसते त्यामुळे तस्करीचा जाळा घट्ट आहे.
आलापल्ली वनविभागात सागवानसारख्या मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.जंगलात कापणी कशी होते, स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग कोणता आणि तस्करीचे मार्ग कोणते, याची चौकशी का होत नाही? या घटनेनंतर तरी आलापल्ली वनविभागाला जाग येईल का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.













