गडचिरोली: नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातून एमपीएससी वनसेवा परीक्षेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) प्रवर्गात राज्यभर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोहित रवींद्र पाल यांनी सहाय्यक वनसंरक्षक (वर्ग-१) पद पटकावले. २०२४ च्या निकालात हे यश खास असून, त्यांनी राज्यसेवा परीक्षाही यशस्वीपणे क्रॅक केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील ठाकुरनगर या छोट्याशा गावात रोहित यांचे बालपण गेले. गाव सरपंचाच्या मुलाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकुरनगर येथून प्राथमिक शिक्षण घेतले. सातवी नंतर सुभाषग्राम येथील इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये सेमी-इंग्रजी माध्यमात शिकले. तिथे शिक्षक जे. ए. सरकार, बी. एन. मंडल आणि अलोने यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दहावीनंतर जे. ए. सरकार यांच्या सल्ल्याने आनंदवन, वरोरा येथे प्रवेश घेतला आणि अव्वल स्थान मिळवले. अभियांत्रिकी पदवीनंतर यूपीएससीसाठी दिल्लीत प्रयत्न केले, पण अंतिम टप्प्यात अल्प फरकाने हुकली. निराश न होता राज्यसेवेकडे वळले. सामाजिक कल्याण अधीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी अशा परीक्षा क्रॅक करून नोकरी सुरू केली. मंत्रालयात रुजू होताच लग्न झाले आणि पत्नीच्या प्रोत्साहनाने पुण्यात वनसेवेची तयारी केली. ऑनलाइन व्याख्याने, डिजिटल नोट्स व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
नक्षलग्रस्त गडचिरोलीसाठी प्रेरणादायी उदाहरण

एमपीएससी वनसेवा ही राज्यातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक. ग्रामीण पार्श्वभूमीतून अभ्याससाधने व मार्गदर्शनाची कमतरता असते, तरी रोहित यांनी ती पार केली. जंगलाशी निगडित या जिल्ह्यात वनसेवक येणे स्थानिक संवेदनशीलतेला बळ देईल. कुटुंबातील पहिला पदवीधर-अधिकारी म्हणून त्यांचे यश “आपणही करू शकतो” असा विश्वास देत आहे. सरकारी वसतिगृहे, प्रबोधन उपक्रम व करिअर गाईडन्समुळे गडचिरोलीची नवी पिढी पुढे येत आहे.
गावात उत्सव आणि जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव

रोहित यांच्या यशाने ठाकुरनगर उत्सवात बुडाले. कुटुंब, नातेवाईक, शिक्षक, मित्र व सोशल मीडियावर गडचिरोलीतील युवकांनी शुभेच्छा दिल्या. आजीची शिकवण, पालक-भाऊ-बहिणींचे पाठबळ व नैसर्गिक वातावरणाने घडलेल्या या प्रवासाने ग्रामीण तरुणांना त्यांनी “जिद्द असेल तर ध्येय अशक्य नाही” असा महत्त्वाचा संदेश दिला आहे. रोहित पाल यांची कामगिरी जिल्ह्यासाठी मानाचा तुरा ठरली आहे हे विशेष.













