• साखर कारखाने व शासनाच्या कृषी विभागाने एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक
ऊसाची माहिती संकलित करावी.
• ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून
एकमेकांना सहकार्य करावे
• ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी
संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.
• अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणीची माहिती लेखी
स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी.
• सोलापूर जिल्हाधिकारी यांना संपर्क करून तेथील साखर कारखान्यामार्फत लातूर,
उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे
• मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित
करून शासनाकडे अहवाल सादर करावा.
• साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान व ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदान
देण्याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून मार्गदर्शन घ्यावे.
लातूर:- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाचे एकरी उत्पादन वाढून तोडणी कार्यक्रम लांबला आहे, असे असले तरी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून येत्या मे-2022 अखेरपर्यंत सर्व ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करावे, नियोजन करित असतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसाड होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित लातूर जिल्ह्यातील ऊस गाळप आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील आता पर्यंतचे ऊसाचे गाळप तसेच शिल्लक ऊस परिस्थितीचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.
या बैठकीस लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, नॅचरल शुगर लि.चे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे चेअरमन राजेश्वर बुके, रेणाचे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विभागीय सहनिबंधक (साखर) बी.एल.वागे, जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, टवेन्टिवन शुगर लि.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी गळीत हंगामाच्या या पूढील कालावधी देखील कारखाने अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे मे अखेर पर्यंत गाळप होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या ऊसाचे सर्व कारखान्यांना नियोजनपूर्वक गाळप करता यावे, यासाठी साखर कारखान्यांनी आणि शासनाच्या कृषी विभागाने शिल्लक असलेल्या ऊसाचा एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक ऊसाची माहिती संकलित करावी. ही माहिती अद्ययावत झाल्यानंतर जास्तीत – जास्त ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.
अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणींची माहिती लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी , म्हणजे शासन पातळीवरून आवश्यक ती मदत मिळण्यासाठी पाठपूरावा केला जाईल.
शेजारी जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, या कारखान्यांना आवश्यक ते सहकार्य करून ऊस घेऊन जाण्यासाठी विनंती करावी. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तेथील साखर कारखान्यातून मार्फत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे.
मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा. जास्तीचे दिवस साखर कारखाना चालवल्यानंतर साखर कारखाना होणाऱ्या नुकसानीबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून माहिती घेऊन शासनाकडे सादर करावी. ही माहिती मिळाल्यानंतर साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदानदेण्याबाबत वसंतदादा शुगर इन्सट्यूटकडून मार्गदर्शन घ्यावे, आदी सुचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी या बैठकीत दिल्या.
प्रारंभी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी जिल्ह्यातील एकूण ऊस परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यानंतर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाकडून त्यांच्या कारखान्यातील गाळपाची माहिती देण्यात आली. संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे राजेश्वर बुके यांनी तसेच कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी यांनी ऊस गाळपाबाबतच्या सुचना यावेळी मांडल्या.