कोरची
कोरची मुख्यालयापासुन 2 कि मी अंतरावर असलेल्या पकनाभट्टी येथे गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास देवरी येथून येत असलेल्या दुचाकी स्वाराने समोरून येत असलेल्या दुचाकीला जबर धड़क दिल्यामुळे दोन्ही दुचाकी रस्त्याच्या कड़ेला फेकली गेली व त्यामध्ये येत असलेले पाचही जन गंभीर रित्या जखमी झाले. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांना प्राप्त होताच त्यांनी लगेच रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु 108 रुग्णवाहिका ही गडचिरोली व 102 रुग्णवाहिका ही चंद्रपुर ला गेली असल्यामुळे तातडीने स्वतःची गाड़ी घेऊन घटनास्थळी भेट देऊन जखमी रुग्णाना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेन्यास मदत केली. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनी सुद्धा आपल्या गाडीने रुग्णाना रुग्णालयात नेन्यास मदत केली व रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली घटनास्थळी तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी भेट देऊन संपुर्ण घटनेची माहिती घेऊन संबधित रुग्णांच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली.
देवरी येथून बेळगावकडे जात असलेली दुचाकी क्रमांक MH – 25 – Z – 4367 मध्ये तिघे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक CG – 04 – LR – 3295 ला जबर धडक दिल्यामुळे पाचही दुचाकी स्वार हे रस्त्याच्या कडेला पड़ून गंभीररित्या जखमी झाले सदर धडक इतकी जबर होती कि पाचही लोकांच्या पायाचे हाड मोडले होते. या पाच अपघातग्रस्तापैकी पुरषोत्तम अलोने (३०) रा.कोहळीटोला, ता. देवरी. अशोक नायक (४५) रा.अंबोरा,जि.गोंदिया आणि कांतालाल घुघवा (१८) रा.दोडके ता. कोरची या तिघांचा उपचाराला नेत असताना मृत्यु झाला. तुळशीराम कवास रा. रेंगेपार जि. गोंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा. दोडके,ता.कोरची हे दोघे गंभीर जखमी आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत कोरची ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण पुढील उपचार मिळण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
सदर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेले असता सदर रुग्णालयाचे काम काज हे नेहमी प्रमाणे वार्यावर दिसून आले. सदर रुग्ण हे बाहेर तरफडत असतांना सुद्धा त्यांना ताडडीने रुग्णालयात दाखल न करता रुग्णालयाचे कर्मचारी हे फक्त बघ्याची भूमिका करीत असल्याचे दिसून आले. सध्यस्थितित ग्रामीण रुग्णालय कोरची येथे 4 वैद्यकीय अधिकारी हे कार्यरत असून सुद्धा रुग्णालयात 3 वैद्यकीय अधिकारी हे नेहमी प्रमाणे गैरहजर दिसून आले. सध्या होळीचा सण असल्यामुळे या सणाच्या वेळी अपघाताचे प्रमाण हे जास्त होत असल्याचे बघितले जाते परंतु सदर रुग्णालय हे फक्त एका डॉक्टर च्या भरविशावर असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. 5 गंभीर रुग्णाचे उपचार फक्त एकच डॉक्टर करीत असल्याचे दिसून आले त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल व नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालय कोरची येथे ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन बॉयोमेट्रिक मशीन आहेत परंतु त्या मशीनी फक्त रुग्णालयाची शोभा वाढवित असल्याचे दिसून येत आहे.