मुलचेरा:राज्याच्या आरोग्य विभागामार्फत संपुर्ण राज्यातील शासकिय व निमशासकिय शाळा आणि अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलीची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर विनामुल्य उपचार, संदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहिम राबविण्यात येणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज या कार्यक्रमाचे दुरभाष्य प्रणालीव्दारे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन आटोपताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
मुलचेरा तालुक्यात १११ अंगणवाडी आणि ९७ शाळांचा समावेश असून या सर्व शाळा आणि अंगणवाडी मध्ये ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार आहे.आज जिल्हा परिषद केंद्र शाळा मुलचेरा येथील विध्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे सकाळी ८.३० वा. दुरभाष्य प्रणालीव्दारे झालेल्या उदघाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.त्यांनतर विध्यार्थ्यांना व उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मार्च अखेरपर्यंत ही मोहीम पूर्ण करायचे असून प्रत्येक बालकाची सर्वांगीण तपासणी, सिस्टिमॅटिक क्लिनिकल तपासणी, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब व तापमान मोजणी व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार त्वरित उपचार,शासकीय तसेच आरबीएसके तसेच एमजेपीजेएवाय अंगीकृत रुग्णालयांमध्ये निशुल्क संदर्भ सेवा व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने मुलचेरा तालुक्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्री, आरबीएसकेचे डॉ. धम्मादीप धाकडे, ग्रामीण रुग्णालयचे डॉ.वाघमारे भरारी पथकचे डॉ.पौर्णिमा वाट,बाल विकास प्रकल्पाचे सुंदरनगर च्या पर्यवेक्षिका डी सी मेश्राम,मुलचेरा केंद्राचे केंद्रप्रमुख देवनाथ बोबाटे तसेच येथील शिक्षक उपस्थित होते.
———————————————-
“राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम” अंतर्गत तालुक्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.जिल्हा परिषद,शासकीय व निमशासकीय तसेच अंगणवाडीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अतिशय चांगला उपक्रम असून बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी सदर विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे व आरोग्य तपासणीचा पुरेपूर लाभ घ्यावा.
-डॉ.विनोद म्हशाखेत्री
तालुका आरोग्य अधिकारी,मुलचेरा












