वरोरा: मराठी चित्रपटातील निर्माता-दिग्दर्शक, लेखक व गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले घनश्याम येडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी काल आनंदवनला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी आनंदवन चित्रपट सृष्टीसाठी आत्मा असून खरोखरच या क्षेत्रातील लोकांनी एकदा तरी स्वरानंदवन आर्केस्ट्रा बघावाच अशी इच्छा व्यक्त केली.
बुधवारी सकाळी दोन मार्चला मराठी चित्रपटातील निर्माता-दिग्दर्शक, लेखक, गीतकार व कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते घनश्याम येडे ज्यांनी एलिझाबेथ एकादशी, नवनाथ अशा बऱ्याच मराठी चित्रपटात अभिनय व लेखन केले असून मराठी चित्रपटसृष्टीत नवीन अभिनय करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे आनंदवनला त्यांची भेट अशा कलाकारांसाठी पर्वणी ठरली. राष्ट्रप्रेम व समाजिक भावनेतून नेहमी ते मराठी चित्रपटात नवीन विषय घेऊन चित्रपट बनवीत असतात.
आनंदवनमध्ये श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या स्मृतीला भेट देऊन त्यांनी डॉ.विकास आमटे यांची भेट घेतली. यानंतर स्वरानंदवन ऑर्केस्ट्रामधील कलाकारांना ते भेटले. यावेळी आनंदवन येथील महारोगी अंध-अपंग, मूकबधीर कलाकारांनी आपले गीत व नृत्य सादर केले. त्यांचे कलानैपुण्य पाहून निर्माता-दिग्दर्शक घनश्याम येडे स्वतःलाच रंगमंचावर जाण्यासाठी थांबवू शकले नाही. स्वरानंद कलाकाराची चित्रफित तयार करू लागले ते यावेळी भावनिक झाले होते. प्रत्येक क्षणाची चित्रफीत तयार करून जीवनभर आठवणीत राहील असे शिक्षण आनंदवनने दिल्याचे मत व्यक्त करत होते. येथील कलाकारांना माझ्या अल्बममध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल व आनंदवनसाठी चित्रपट सृष्टीमध्ये मिळालेला काही आर्थिक भाग आनंदवनसाठी शिल्लक ठेवील असेही ते म्हणाले.आम्हाला हात पाय व्यवस्थित असून इतके चांगले नृत्य आम्हीसुद्धा करू शकत नाही. अंध, अपंग ज्यांना पाहता येत नाही अशी व्यक्ती सुरेल गाणे गात आहे. त्यामुळे आम्ही चित्रपटसृष्टीत काहीच कमावले नाही. चित्रपटसृष्टीत ज्यांनी कमावले असं वाटते त्यांनी एकदा आनंदवनला येऊन बघावेच अशी तीव्र इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिवसभर आनंदवनचा संपूर्ण फेरफटका मारत आनंदवनवाशीयांनी केलेल्या कामाची स्तुती करत होते. स्वरानंदवनसारखे अनेक अंग संधीनिकेतन, अनाथालय, महारोगी दवाखाना, हस्तकला, अशा अनेक विभागाला त्यांनी भेटी दिल्या. आनंदवनातील कार्यकर्ते राजेश ताजने यांनी पाहुण्यांना आनंदवनाचा संपूर्ण परिसर दाखविला आणि माहिती दिली.
यावेळी महारोगी सेवा समिती समितीचे विश्वस्त सदाशिव ताजणे, डॉ. सागर वझे,मोहन रंगदळ, देविदास आंबेकर, अशोक गाढे, सतीश नाजरकर, सुनील गावडे, आदी मान्यवरांची उपस्थित होती.