अहेरी:- विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मैदानी क्रीडा स्पर्धांची गरज असून या स्पर्धा खेळातूनच पुढे महाराष्ट्र व देशपातळीवरील क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. पहांदी पारी कुपार लिंगो समिती नागेपल्ली तर्फे प्रभूदास आत्राम यांच्या भव्य पटांगणावर 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उदघाटन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,जेष्ठ कार्यकर्ते तथा ग्रा सदस्य मलरेड्डी येमनूरवार,गीता धुर्वे,पुष्पा अलोने,कैलास कोरेत,ग्रामपंचायत सदस्य आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सांघिक खेळांत अनेक खेळाडूंचा एक संघ दुसऱ्या संघाशी सामना खेळतो. अशा सांघिक खेळात सांघिक भावना, सहकार्य, नेतृत्व यासारख्या गुणांना वाव मिळून त्यांचा विकास होतो. त्यामुळे केवळ क्रिकेटच नव्हे तर हॉकी, फुटबॉल, कबड्डी सारखे सांघिक खेळ खेळला पाहिजे आणि यामध्ये खंड न पडू देता सातत्य राखले पाहिजे,असेही यावेळी त्यांनी आवाहन केले.
3 मार्च पासून सुरुवात झालेल्या 30 यार्ड सर्कल क्रिकेट सामन्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते बबलू भैया हकीम तर तृतीय पारितोषिक नागेपल्लीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर धकाते यांच्याकडून देण्यात येणार आहे. सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी आलेल्या मान्यवरांचे नागेपल्ली वास यांनी ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले.