चंद्रपूर :- नेहमीप्रमाणे विधानभवन परिसर उपोषण मंडपांनी गजबजलेला होता, पण यावेळी एक बॅनर आकर्षित करत होते, “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वारसदारांच्या मागण्यांचा.” उपोषण मंडपात महात्मा फुलेंची नातसून श्रीमती नीता रमाकांत होले आणि त्यांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे उपोषणाला बसले होते.
या मंडपात भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार गेले आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेत या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. मुनगंटीवार यांनी फुले दाम्पत्याच्या नावाने राजकारण करणाऱ्यांवर सवाल केला, “ज्यांच्या नावाने काँग्रेस राजकारण करत आहे, त्यांच्या वारसदारांना उपोषणास बसावे लागेल का?” त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला कार्यवाहीचे निर्देश दिले.
मुनगंटीवार यांनी यापुढे मार्चच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून, कपात सूचना दिल्या आणि हा विषय नेहमीच उठवला. जुलैच्या अधिवेशनात त्यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला उत्तर दिले आणि दिलेल्या आश्वासनानुसार फुलेंच्या वारसांना विशेष नोकऱ्या दिल्या.
मुनगंटीवार यांच्या संसदीय संघर्षाचा यशस्वी परिणाम झाला. क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या वाड्याचे नूतनीकरण, भिडेवाड्याची दुरुस्ती, आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात उचललेली होती, त्या पुणे विद्यापीठाला ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ हे नाव देण्याची मागणी देखील मुनगंटीवार यांनी केली आणि यशस्वी झाली.
आज मुनगंटीवार पुन्हा भिडेवाडयात ज्योतीराव आणि सावित्रीबाईंचे स्मारक उभारण्याच्या संघर्षात उभे आहेत. फुले दाम्पत्याच्या विचारांवर श्रद्धा ठेवत प्रत्यक्ष कृती करून त्यांच्या वारसांना न्याय मिळवून देणारे सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच एक कृतिशील नेता म्हणून आमच्यासाठी आदर्श राहतील.
*नीता होले
महात्मा फुलेंची वंशज
पुणे