अहेरी: भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे स्पष्ट सूचना ६९-अहेरी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एटापलीचे उपविभागीय अधिकारी नमन गोयल, अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी उपस्थित होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर रोजी ६९-अहेरीचे निवडणूक निर्णय अधिकारी कुशल जैन यांनी नोडल अधिकारी, विभाग प्रमुख,राजकीय पक्ष,प्रिंटिंग प्रेसची वेगवेगळी बैठक घेऊन नियमांची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन ६९-अहेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकसंबंधी विविध माहिती त्यांनी दिली.
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
आदर्श आचारसंहिता लागू होताच प्रशासनाकडून निवडणुकीसाठी जयत तयारी सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान विविध बाबींवर नजर ठेवण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून यात ३ स्थिर निगराणी पथक, ३ फिरते पथक, तसेच ५ व्हिडिओ निगराणी पथक कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती कुशल जैन यांनी दिली.
३०० मतदान केंद्रावर होणार मतदान
६९ – अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३०० मतदान केंद्र आहेत. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला २९२ मतदान केंद्र होती.यावेळेस ८ मतदान केंद्र वाढली आहेत.या तीनशे मतदान केंद्रातून तब्बल २ लाख ५० हजार ९८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.तर
आंतरराज्यीय सीमा सील
भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली त्यांनतर प्रशासन सज्ज झाले.लगेच १६ ऑक्टोबर रोजी आंतरराज्यीय सीमा सील करण्यात आली.अहेरीला तेलंगाणा राज्याची सीमा लागून असल्याने आंतरराज्य सीमा ओलांडून अवैध दारू, रोख रक्कम आणि अंमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यासाठी वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीच्या पुलावर चेक पोस्ट बसविण्यात आले आहे.महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून याठिकाणी पाळत ठेवली जात आहे.