मूल (): तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवरात वाघाचे मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर वाघ हा मादी असून अंदाजे दीड वर्षाचा होता. वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूमोनिया संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
मूल आणि सावली तालुक्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. डोंगरगाव येथील माया रमेश सांगुळले यांच्या शेतात (सर्व्हे नं. 1038) वाघाचे मृतदेह आढळून आले. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याने वाघ मृत अवस्थेत पाहिल्यानंतर गावकऱ्यांना कळवले. याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.
वाघाचे मृतदेह चंदूर येथील टीटीसी केंद्रात नेण्यात आले, जिथे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी मृतदेहाचे दहन करण्यात आले. घटनास्थळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी उमेश झिरे आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संघटनेचे प्रतिनिधी मुकेश भांडककर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.