गडचिरोली:दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून दारू तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जात आहे. ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मुलचेरा पोलिस जास्त घालत असताना तब्बल १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आकाश भाऊराव भरडकर वय २५ वर्ष चालक, रा. गोकुळनगर वार्ड क्र.१६ ता.गडचिरोली जि. गडचिरोली,संदीप नरेश कोलते वय ३१ वर्ष रा. खरवी ता. ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर,संदीप रघुनाथ ठाकरे वय ३५ वर्ष रा. खेड ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर असे तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नुकतेच ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास मुलचेरा पोलिस गस्त घालत असताना आष्टीहुन मुलचेरा मार्गे आलापल्लीकडे जाणाऱ्या एम एच-४९ बी झेड-४०८४ अशोका लेलँड कंपनीच्या बडा दोस्त वाहन जात होती.पोलिसांनी हात दाखवत वाहन थांबविली.वाहनात पॉपकॉर्न भरलेले १८ नग प्लास्टिक पोती होती.मात्र,वाहनातील इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याने त्यांचे हावभाव पाहून पोलिसांनी त्या वाहनाची निरखून पाहणी केली. वाहनाचा मागील काही भाग वेल्डिंग केल्याचे आढळले.पोलिसांनी पॉपकॉर्नचे प्लास्टिक पोते बाहेर काढल्यावर त्या वाहनात कप्पे तयार केल्याचे आढळले.वाहनाच्या आत मधील कप्पे उघळताच अवैध दारू वाहतूक करत असल्याचे आढळले. पोलिसांनी ३ लाख ८५ हजारांची संत्रा देशीचे ८४ बॉक्स अवैध दारू व ७ लाख किमतीचे वाहन असे तब्बल १० लाख ८५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा काही नेम नाही.दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे.कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून, तर कधी पार्सल सामानातून दारूची तस्करी केली जात आहे. या तरुणांनी मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी नवीनच जुगाड केला आहे. त्या तरुणांचा हा नवीन जुगाड पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
एका चुकीनं डाव फसला
सदर वाहनात ज्वारीचे पॉपकॉर्न वाहतूक करत असताना वाहनाचा मागचा पल्ला ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्याठिकाणी नव्हता.कप्पे तयार केल्याच्या ठिकाणी मागचा पल्ला वेल्डिंग करून असल्याने आणि त्या वाहनातील इसमांचा संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांना शंका निर्माण झाली आणि ज्वारीचे पॉपकॉर्न ने भरून असलेली पोती बाहेर काढताच अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचा डाव फसला आणि पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम रमेश,उपविभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मुलचेराचे ठाणेदार महेश विधाते यांनी केली.
————————————————————–
नागरिकांनी कुठल्याही अवैध व्यवसायात गुंतू नये.अवैध दारू विक्री किंव्हा वाहतूक करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.परिसरातील काही गावांत देखील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुलचेरात अवैध व्यवसायाला थारा देणार नाही.
-महेश विधाते,पोलिस निरीक्षक मुलचेरा