अहेरी:- केवळ बोर्डाची परीक्षा किंवा पदव्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो तर स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला नवी कलाटणी मिळत असते असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते शनिवार 28 सप्टेंबर रोजी येथील वासवी सेलिब्रेशन हॉल करीयर मार्गदर्शन महाशिबिरात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून हर्षवर्धनराव बाबा आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य, तनुश्रीताई आत्राम सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, रा.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत, माजी प्राचार्य रतन दुर्गे, प्राचार्य मारोती टिपले, प्राचार्य गणपत मेश्राम, नगर सेवक विलास सिडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय स्थानावरून पुढे बोलताना ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, स्पर्धा परीक्षेतील यश हे किती नामांकित शाळेत शिकलो यावर अवलंबून नसून केवळ गुणवत्तेवरच आधारित असून सामान्य वर्गातूनच स्पर्धा परीक्षा मिळवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे जिद्द आणि मेहनत बरोबर अभूतपूर्व यश हा फार्मूलाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.केवळ दहावी, बारावी, पदवी घेऊन उत्तीर्ण होणे म्हणजे शिक्षण नव्हे , तर स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून एमपीएससी, युपीएससीचे लक्ष्य गाठणे हेच खरे शिक्षण असून यातून जीवनात, कुटुंबात पर्यायाने समाजात एक नवी कलाटणी प्राप्त होते आणि विद्यार्थ्यानी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेकडे अधिक लक्ष घालणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
यावेळी सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम,रवींद्र वासेकर बबलु हकीम, सुरेंद्र अलोणे यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षे विषयी आपले मनोगत व्यक्त केले. याच वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तर उपस्थित सर्वांना भारतीय संविधान पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल परशुरामकर यांनी तर सूत्रसंचालन रुपेश कराळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षिका व बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. यशस्वितेसाठी धर्मराव बाबा आत्राम मित्र परिवार आणि नारायणन आय.ए.एस.अकॅडमी, नागपूर यांनी परिश्रम घेतले.