अहेरी:तालुक्यातील जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या येर्रागड्डा गावातील बाजीराव रमेश वेलादी (६ वर्ष) आणि दिनेश रमेश वेलादी (३वर्ष) या दोन भावंडांचा ४ सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. ७ सप्टेंबर रोजी अहेरीचा अख्ख प्रशासन गावात पोहोचला.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत अभिनव लोकजागर मोहीम राबवून या परिसरातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलनाची व प्राधान्याने वैद्यकीय उपचार घेण्याची शपथ दिली.त्यांनी दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलांच्या आई-वडिलांची सांत्वनापर भेट घेऊन आस्थेने संवाद साधत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान परिसरातील नागरिकांशी सुद्धा संवाद साधून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी माडिया व तेलगू भाषेत शपथ देण्यात आली. एवढेच नव्हे तर लोक जागराचे बॅनर्स गावागावात लावून गावातील तरुण वर्गाला विकासदूत म्हणून काम करण्याचे आवाहन केले.
यादरम्यान त्यांनी जीमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा भेट दिली.आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील त्यांनी मनोधैर्य वाढविले. गावपातळीवर काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेला लोकजागर मोहीम नक्कीच कामी येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
यावेळी अहेरीचे गटविकास अधिकारी राहुल वरटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे,मंडळ अधिकारी संतोष श्रीराम,प्राथमिक आरोग्य केंद्र,उप केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,सरपंच,उपसरपंच,तलाठी,कोतवाल आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.