गडचिरोली:- मागील काही दिवसापासून सर्रासपणे सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून पोलिसांनी २१ आरोपींना ताब्यात घेत चक्क १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई मुलचेरा तालुक्यातील चिचेला जंगल परिसरात मुलचेराचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलचेरा तालुक्यातील चिचेला ते आपापल्ली मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजारावर मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याची माहिती मिळताच मुलचेराचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी रविवार (२५ ऑगस्ट) ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान धाड टाकून सुमारे १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.२१ आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये भाऊजी शिवराम वाघमारे रा. सिंगनपेठ ता.अहेरी,सागर प्रकाश वाकुडकर रा. चांदेश्वर ता.चामोर्शी,ईश्वर नानाजी सडमेक रा. गोमणी ता. मुलचेरा,राजेंद्र व्यंकया तानसेन रा. येचली ता. भामरागड,आदर्श निलेश खोबरे रा. वेलगुर ता. अहेरी,राकेश भिमा आलाम रा. दिना चेरपली ता. अहेरी,प्रसनजित प्रशांतो मंडल रा. भवानीपुर ता. मुलचेरा,कमलेश सुशांत मंडल रा. भवानीपुर ता. मुलचेरा,सुनिल सुधाकर निकेसर रा. कोडीगाव ता. मुलचेरा,संतोष शंकर कोटरंगे रा. नवेगाव ता. अहेरी,मोरेश्वर गिरमाजी तुंकलवार रा. चिचेला ता. मुलचेरा,साईनाथ शंकर कडते रा. कोडीगाव, ता. मुलचेरा,अनिकेत राजु दुर्गे कामरा. गोमणी ता. मुलचेरा,अशोक भिमराव नैताम रा. आपापली ता. अहेरी,रामकृष्ण सिडाम दास रा. भगतनगर ता. मुलचेरा,परितोष ब्रोजेन बिश्वास रा. खुदीरामपल्ली ता. मुलचेरा,रघुनाथ दशरथ नैताम रा. बंदुकपल्ली ता. मुलचेरा,बुधाजी गंगाराम येरमे रा. चिचेला ता. मुलचेरा,भुजंगराव मुसली मडावी रा. बंदुकपल्ली ता. मुलचेरा,सोमा शिवा आत्राम रा. लगाम ता. अहेरी,गंगाराम रामया डुबले रा. आपापल्ली ता.अहेरी यांचा समावेश आहे.
घटना स्थळावरून ३० नग मोटारसायकल ( एकूण किंमत १५ लाख ३० हजार),१३ नग मोबाईल फोन (एकूण किंमत ४५ हजार),रोख रक्कम १४ हजार ७५०,५ नग जिवंत कोंबडे (किंमत १९५०),लोकांडी धारदार तात्या २० नग (एकूण किंमत १ हजार रुपये),मोजमाप काटा १ नग (किंमत ५०० रुपये) असे एकूण १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.मुलचेराचे ठाणेदार म्हणून महेश विधाते यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून अवघ्या पंधरा दिवसांतच त्यांनी कोंबडा बाजारावर मोठी कारवाई केली. त्यामुळे दारू व्यवसायिक, सट्टापट्टी धारकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांना वचक बसेल अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे.
विशेष म्हणजे या कारवाई वरून याभागात मागील काही दिवसापासून किरकोळ संघटित टोळ्या तयार करून अनाधिकृत सट्टा व जुगाराचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.अटक केलेल्या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सोमवारी (२६ ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली आहे.
कारवाईने अवैध व्यावसायिक धास्तावले
मूलचराचे ठाणेदार महेश विधाते यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर १५ दिवसांतच त्यांनी कोंबड बाजारावर मोठी कारवाई करत सुमारे १५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. मुलचेरा पोलीस स्टेशन अंतर्गत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानली जात आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दुर्गम भागात पोलीस जात नाही. याचा गैरफायदा घेत जंगल परिसरात कोंबड बाजार चालवून लाखो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. मात्र नवनियुक्त पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी थेट जंगल परिसरात जाऊन ही कारवाई केल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे. तर अवैध व्यवसायिकामध्ये धडकी भरली आहे.