चंद्रपूर : दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाशरद पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार मदत मिळवून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी www.mahasharad.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.
पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगासाठी सहाय्य उपलब्ध होण्याची संधी असून ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करू शकतात. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंच्यावर विस्तृतपणे नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य मिळवू शकतात. महाशरद पोर्टलवर नोंदणीसह सर्व प्रक्रिया विनामूल्य असून या माध्यमाद्वारे राज्यातील अनेक घटक एकत्र येऊन दिव्यांगांना मदत व सहकार्य करू शकतील. त्याकरिता दिव्यांग बांधव www.mahasharad.in या पोर्टलद्वारे आवश्यक बाबीसंदर्भात मागणी नोंदवू शकतात. हे पोर्टल म्हणजे दिव्यांग व्यक्ती, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व कंपन्या यांना जोडणारा दुवा आहे. तरी,जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनी याचा लाभ घेण्यासाठी सदर पोर्टलवर तात्काळ नोंदणी करून घ्यावी. असे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.