गडचिरोली: तीन हिस्सेदारांच्या नावाने जमिनीचा फेरफार करुन त्यांची नावे सातबारावर नोंद करण्यासाठी संबंधित इसमाकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील महागाव साजाचा तलाठी व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) व खमनचेरु येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) यांना अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला तीन व्यक्तींच्या नावाने असलेल्या जमिनीचा फेरफार करुन त्यांची नावे सातबारावर नोंद करावयाची होती. त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने स्वतःसाठी आणि मंडळ अधिकारी भूषण जवंजाळकर याच्यासाठी प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते दोघांसाठी प्रत्येकी ३ हजार याप्रमाणे एकूण ६ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी पडताळणी करुन सापळा रचला असता आज दोघांना ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. जल्लेवार व जवंजाळकर यांच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
विशेष म्हणजे एक ऑगस्ट रोजी राज्यभरात महसूल दिन साजरा करण्यात आला. सध्या पंधरवडा देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना महसूलचे मंडळ अधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर,अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले,पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड,सहायक फौजदार सुनील पेद्दीवार,हवालदार शंकर डांगे, हवालदार किशोर जौंजारकर, प्रवीण जुमनाके यांनी केली.
जिल्ह्यात सतत दोन दिवस एसिबीची कारवाई
रस्ता कामाची मोजमाप पुस्तिका (एम.बी.) देण्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल १ ऑगस्ट रोजी अटक केली. ही कारवाई धानोरा येथे बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात करण्यात आली.यात अक्षय मनोहर आगळे (२९) वर्ग-३ असे कनिष्ठ अभियंत्याला अटक झाली.तो धानोरा येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होता.