चंद्रपूर : विदर्भातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या बल्लारपूर येथुन मुंबई व पुण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, मांजरी आणि बल्लारपूर येथील रेल्वे भूमिवर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा निकाली काढताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी वैष्णव यांना निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर-नागपूर ब्रॉडगेज मेट्रो सेवा सुरू करण्याची मागणी यावेळी आ. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. याबाबत देखील श्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
बल्लारपूर येथे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रमिक बल्लारपूरमध्ये वास्तव्यास आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त आहे. चंद्रपुरातील अनेक विद्यार्थी पुणे-मुंबई येथे शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने राहतात. चंद्रपुरातून प्रवास करण्यासाठी पुणे-मुंबईसाठी थेट रेल्वे सेवा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब आ. मुनगंटीवार यांनी मंत्री वैष्णव यांच्या लक्षात आणून दिली.
आ. मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत रेल्वे वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना बल्लारपूर-पुणे आणि बल्लारपूर-मुंबई या दोन नव्या थेट रेल्वे सेवांची चाचपणी करण्याचे आदेश दिलेत. या दोन्ही रेल्वे गाड्यांना विदर्भातील वर्धा, पुलगाव, धामणगाव रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला येथे थांबा द्यावा, त्यानंतर ती ‘नॉनस्टॉप’ पद्धतीने चालविता येते काय, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत.
अतिक्रमणाबाबत तोडगा काढणार
बल्लारपूर, मूल, माजरी येथील रेल्वे भूमिवरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान तेथील सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, असा तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही वैष्णव यांनी दिली.
बल्लारशाह शहराजवळ असलेल्या शांतीनगरातील रेल्वे भूमिवर शंभरावर लोक राहतात. येथे राहणारे नागरिक श्रमिक आहेत. त्यांना अलीकडेच रेल्वेने सात दिवसात जमीन सोडण्याची नोटीस बजावली आहे. मूल रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येते. येथील रेल्वे भूमी परिसरात अनेक लोक गेल्या ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या लोकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था मालमत्ता करही वसूल करते. या भागात निवास करणाऱ्यांना पक्के वीज मीटर देण्यात आले आहे. नागरिकांनी या जमिनीच्या स्थायी पट्ट्याची मागणी केली आहे. माजरी गावातील रेल्वे भूमिवर गेल्या ५० वर्षांपासून ५ हजार लोक वास्तव्यास आहेत. रेल्वे विभागाने येथेही कारवाई सुरू केल्याने अनेकांच्या रोजगार व निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तीनही ठिकाणच्या नागरिकांचे पुनर्वसन होत नाही किंवा या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोवर त्यांना मानवी दृष्टीकोन ठेवत हटविण्यात येऊ नये, अशी कळकळीची विनंती आ. मुनगंटीवार यांनी केली.
आ. मुनगंटीवार यांची विनंती मान्य करीत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या मुद्द्यावर तोडगा काढण्यात येईल, असा शब्द त्यांना दिला. अधिकाऱ्यांनी माणुसकी जपत योग्य ती पावले उचलावी, असे आदेशही त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी श्री अजय दुबे सदस्य रेल उपभोक्ता सलाहकार समिति मध्य रेलवे मुंबई तथा प्रदेश महासचिव भाजपा कामगार मोर्चा, श्री सिंह , श्री आर पी सिंह यांची उपस्थिती होती.