गोंडपिंपरी – (सुरज माडूरवार)
तालुक्यातील गट ग्रामपंचायत चेकघडोली अंतर्गत येणाऱ्या सुरगाव येथील नळ योजना अनेक दिवसांपासून बंद आहे.गावात वर्ष भरातून सहा महिने कोणत्या ना कोणत्या कारणाने येथील पाणीपुरवठा ठप्प असतो. पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अशातच गावात कुठलेही पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नाही.गावातील नागरिक सार्वजनिक बोरिंगच्या माध्यमातून तहान भागवतात.आता मात्र १७ दिवसांपासून सुरगाव येथील वॉर्ड क्रमांक एक मधील विजय कुंभरे व गावातील अन्य काही बोरिंगमधे बिघाड आल्याने प्रशासनाने दुरुस्त केल्या नाही.परिणामी पावसाळा सुरू झाल्याने चिखलातून वाट काढत शेतातील विहरीच्या गढूळ पाण्याने नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी लाखाच्या जवळपास पाणी कर ठप्प आहे.गावात पाणी पुरवठा योग्य होत नसल्याने नागरिकांनी देखील नियमित कर भरला नाही.बोरिंग देखभाल दुरुस्तीचें पैसे ग्रामपंचायतीने पंचायत समितीला भरले नसल्याने बोरिंग दुरुस्तीसाठी पंचायत समिती कर्मचारी पाठवायला तयार नाही.ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ बोरिंग दुरुस्त करावी अन्यथा संपूर्ण गावकरी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता धीरज मडावी यांनी दिला आहे.