गडचिरोली: राज्य सरकारने नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभर लाडक्या बहिणींच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहेत.या योजनेला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र राज्य भारतील लाडक्या बहिणींना नेमकं लाभ केंव्हा मिळणार याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीतील एका कार्यक्रमात थेट घोषणाच केली आहे.मात्र,त्यात सुरुवातीला घोषणा केल्याप्रमाणे काही अटी कायम राहणार असून कुणाचेही नुकसान होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या वडलापेठ येथे एका स्टील प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते आले होते. त्यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘लाडकी बहीण योजने’बाबत मोठी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे लाखो संख्येने अर्ज भरले जात आहे. या योजनेचा लाभ केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान पहिल्या टप्प्यातील निधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही निधी देत असताना सुरुवातीला घोषणा केल्याप्रमाणे ३१ ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांचे अर्ज जुलै मध्ये आले असं समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत. यात कोणाचाही नुकसान होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पहिला हप्ता आता ऑगस्ट महिन्यात मिळणार असून महायुती सरकारचा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट दिली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा होणार अशी आशा निर्माण झाली आहे.